सुपीक आणि दुष्काळी परिसर असा दुहेरी तोंडवळा लाभलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक असून कळवण मतदारसंघात ही संख्या सर्वात कमी असल्याचे लक्षात येते. तुलनेत अधिक मतदारसंख्या असणाऱ्या भागातील प्रचाराकडे सर्वच उमेदवारांनी विशेष लक्ष दिले आहे. या भागातून अधिकाधिक आघाडी मिळविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे.
दिंडोरी या राखीव मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. महायुती, काँग्रेस आघाडी, डावी आघाडी, आम आदमी पक्ष आणि बसपा अशा प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे स्वरूप लक्षात घेतल्यास दिंडोरी व कळवणसारखे आदिवासीबहुल तालुके, निफाडसारखा सधन परिसर आणि चांदवड, येवला व नांदगाव या दुष्काळी तालुक्यांचा त्यात समावेश होतो. या मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या १५ लाख ०५ हजार ४९३ इतकी आहे. युवकांना मतदानाची संधी मिळावी, याकरिता निवडणूक आयोगाने विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले होते. त्या अनुषंगाने मतदारांची संख्या काही अंशी पुरवणी यादी समाविष्ट झाल्यावर वाढू शकते. सद्य:स्थितीत या मतदारसंघात सात लाख ९२ हजार ०९५ पुरुष, तर सात लाख नऊ हजार ९४० महिला मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी सेनादलातील मतदारांची संख्या ३४५८ इतकी आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारसंघात दोन लाख ७६ हजार मतदार आहेत. सर्वात कमी मतदारसंख्या आहे ती कळवण विधानसभा मतदारसंघाची. या ठिकाणी दोन लाख ३० हजार ८१७ मतदार आहेत. नांदगावखालोखाल क्रमांक लागणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघात दोन लाख ६१ हजार ७३९ मतदार आहेत, तर दिंडोरी मतदारसंघात ही संख्या दोन लाख ५३ हजार ७१५ इतकी आहे.
चांदवड मतदारसंघात दोन लाख ४५ हजार ९६, तर निफाड मतदारसंघात दोन लाख ३७ हजार २१७ मतदार आहेत. सेनादलातील मतदारांमध्ये ५१९ महिला, तर २९३९ पुरुष असे मतदार आहेत. आकारमानाच्या दृष्टीने विस्तीर्ण असलेल्या या मतदारसंघात प्रचार करणे तसे प्रत्येक उमेदवारासाठी जिकिरीचे काम. अधिक मतदार संख्या असणारे विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कळीची भूमिका निभावतील, असा अंदाज बांधून उमेदवारांनी अशा ठिकाणी अधिक लक्ष दिले आहे.
नाशिकमध्ये शहरी मतदारांचे वर्चस्व
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या साडेपंधरा लाखांहून अधिक असली तरी नाशिक मध्य, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिमसोबत नाशिकरोड व देवळाली मतदारसंघातील काही भाग शहरात समाविष्ट होत असल्याने या ठिकाणी मतदारांची संख्या अधिक आहे. यावरून मतदारसंघावर शहरी मतदारांचा वरचष्मा राहणार असल्याचे दिसते. नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या १५ लाख ४९ हजार ८६ इतकी आहे. विशेष मतदान नोंदणीमुळे त्यात आणखी काही वाढ होईल. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे दोन लाख ८३ हजार ९७ मतदार आहेत, तर सर्वात कमी दोन लाख २५ हजार ५८० मतदार नाशिकरोड-देवळाली विधानसभा मतदार आहेत. याव्यतिरिक्त शहरातील नाशिक पूर्व मतदारसंघात ही संख्या दोन लाख ८० हजार ५३३, तर नाशिक मध्यमध्ये दोन लाख ७१ हजार १०९ मतदार आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघात दोन लाख ६० हजार, तर इगतपुरीमध्ये ही संख्या दोन लाख २८ हजार १३६ आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सेनादलातील २७९९ पुरुष, तर ७२३ महिला असे ३५२२ मतदार आहेत. सिन्नर व इगतपुरी हा परिसर वगळल्यास उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघ एक तर पूर्णपणे शहरी भागातील वा आसपासच्या परिसराचे आहेत.