एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच वेळी दोन ते तीन वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांची प्रवेशपत्रे धाडून मुंबई विद्यापीठाने आपली गोंधळाची मालिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीकरिता होणाऱ्या लेखी परीक्षेतही कायम ठेवली आहे.
विद्यापीठातील कनिष्ठ टंकलिपिक, संशोधन साहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, अभिलेख साहाय्यक, सांख्यिकी लिपिक, वीजतंत्री आदी १४ प्रकारच्या १२० पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा होणार आहे. पण, एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रत्येक पदासाठीचे वेगवेगळे परीक्षा ‘प्रवेशपत्र’ पाठवून विद्यापीठाने कोडय़ात टाकले आहे. कारण सर्व पदांच्या लेखी परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २० मे रोजी होणार असून त्यांची परीक्षा केंद्रेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे, एकाच दिवशी दोन किंवा तीन परीक्षांना हजेरी कशी लावायची, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
आतापर्यंत विद्यापीठाची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती निवड समितीमार्फत मुलाखती घेऊन होत असे. या वर्षी प्रथमच लेखी परीक्षेने नोकरभरती केली जाणार आहे. उमेदवार एकाच वेळी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज करतील ही शक्यता गृहीत धरून लेखी परीक्षेचे स्वरूप ठरवायला हवे होते. पण, ही मूलभूत बाबच नजरेआड केल्याने हा घोळ झाला आहे.
उदाहरणार्थ- एका उमेदवाराने कनिष्ठ टंकलिपिक, कनिष्ठ लघुलेखक या पदांकरिता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क भरून अर्ज भरला होता. त्याला टंकलिपिक पदाकरिता चर्नीरोडचे हिंदुजा महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून आले आहे, तर लघुलेखक पदाकरिता अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात परीक्षा द्यायची आहे. या उमेदवाराने एकाच दिवशी आणि वेळी या दोन्ही परीक्षा केंद्रांवर हजेरी कशी लावायची असा प्रश्न आहे.
विद्यापीठाचे एक अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी हा घोळ विद्यापीठाच्या लक्षात आणून दिला. त्यावर अशा उमेदवारांनी कोणत्याही एकाच परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे स्पष्टीकरण कुलगुरूंनी केले. पण, मुळात टंकलिपिकाची निवड लघुलेखक पदासाठी दिलेल्या परीक्षेवर कशी करायची, असा प्रश्न आहे. ‘त्यातून परीक्षा तीन दिवसांवर आलेली असताना हजारो उमेदवारांना हा बदल कळवायचा कसा? आणि एकच परीक्षा द्यायची तर तीन-तीन पदांसाठी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे उमेदवारांकडून शुल्क आकारणे न्यायाला धरून होते का,’ असा प्रश्न वैराळ यांनी केला.
उमेदवारांना एकापेक्षा जास्त परीक्षाकेंद्रांचे ‘प्रवेशपत्र’
एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच वेळी दोन ते तीन वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांची प्रवेशपत्रे धाडून मुंबई विद्यापीठाने आपली गोंधळाची मालिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीकरिता होणाऱ्या लेखी परीक्षेतही कायम ठेवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates got more than one examination centre entry card