लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपून मतदानाचा दिवस उजाडला तरी नाशिक जिल्ह्यातील ज्या  प्रमुख शहरांमध्ये प्रचाराचा कोणताही मागमूस दिसला नाही, अशा गावांमधील एक म्हणून दिंडोरी मतदारसंघातील मनमाडचा उल्लेख करावा लागेल. या मतदारसंघातील सर्वाधिक मतदार संख्या या शहरात असतानाही प्रचाराचे असे कोणतेच वातावरण जाणवले नाही. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोणतीही मोठी सभा नाही. ना उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला, ना कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे मनमाडच्या समस्या कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. पिण्याच्या पाण्यासह शहरातील आरोग्य, अस्वच्छता या समस्या इतक्या टोकाला गेल्या आहेत की त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यासही कोणी तयार नाही. त्यामुळेच उमेदवारांनी मनमाडचा दौरा करण्याचे टाळल्याचे म्हटले जात आहे.
नांदगावचे आमदार पंकज भुजबळ हे साडेचार वर्षांपासून मनमाडमध्ये फिरकले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याने किमान आमदार किंवा त्यांचे पिताश्री छगन भुजबळ हे यानिमित्ताने मनमाडकरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून किंवा प्रत्यक्ष आवाहन करून मते मागतील अशी मनमाडकरांना अपेक्षा होती, परंतु या दोघांपैकी कोणीही मनमाडमध्ये फिरकले नाहीत. साडेचार वर्षांपूर्वी पुत्र पंकज यांच्यासाठी येथील एकात्मता चौकात झालल्या प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी दोन वर्षांत मनमाडचा पाणी प्रश्न न सुटल्यास भुजबळ नाव लावणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्यासंदर्भात आजपर्यंत मनमाडमध्ये येऊन जाहीरपणे वक्तव्य करणे त्यांनी टाळले आहे.
मनमाड व नांदगाव दोन्ही नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या, ग्रामपंचायती विकास सेवा सोसायटय़ा असे सर्वत्र आघाडीचे वर्चस्व असतानाही उमेदवार डॉ. भारती पवार यांनी या भागाकडे फारसे लक्ष दिले नाही. हा मतदारसंघ मुळात ६० वर्षांपासून तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. साडेचार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने आमदारकी मिळवत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला. आघाडी असली तरी दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांविषयी नाराजी आहेच. आघाडीचे हे हाल तर सलग १० वर्षे खासदारकी भोगत असलेले महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांची गतही थोडय़ा फार फरकाने अशीच आहे. या भागात प्रभावी काम नसल्याचा सातत्याने आरोप होत असलेल्या खा. चव्हाणांनाही या वेळी मतदारांशी थेट संपर्क साधण्याची गरज भासली नाही.
मोदी लाटेच्या विश्वासावर त्यांनी या भागात वर्चस्व असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी तसेच रिपाइंच्या कार्यकर्त्यांशी संपर्कही ठेवला नाही. भाजपचे तर या भागात कोणतेच संघटन नाही. त्यामुळे निवडणुकीची हवा शेवटपर्यंत वाटलीच नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मनमाडकर काय भूमिका घेतात याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे.
कित्येक वर्षांपासून १० ते २० दिवसाआड मिळणारे पाणी ही आता मनमाडकरांसाठी सवय झाली आहे. पाण्याबद्दल जाहीरपणे बोलण्याचे कोणी धाडसच करत नाही. परिसरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्याने, तुंबलेल्या गटारींनी आरोग्य धोक्यात आले आहे. भारनियमनाचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. उद्योगधंदे, व्यापार ठप्प झाला आहे. ना औद्योगिक वसाहत ना धड तालुका, अशी अवस्था असल्याने मनमाडकर हळूहळू नाशिकला स्थलांतरित होत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाची सुविधा नाही. देयक न भरल्याने पालिकेचे पथदीप चक्क दोन-दोन महिने बंद असतात. या समस्यांनी जीव मेटाकुटीला आलेले मनमाडकर मतदान तरी कोणाला करणार?

Story img Loader