भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी २ सप्टेंबरला पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर झाले आहे. मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे या पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जाते. या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
खासदार मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना भाजपकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सहा वर्षांसाठी असलेल्या या आमदारकीतील दोन वष्रे शिल्लक आहेत. निवडणूक विभागाने २ सप्टेंबरला ही पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारपासून (दि. १६) उमेदवारी अर्ज भरणे, २४ ऑगस्ट अर्जाची छाननी व २ सप्टेंबरला मतदान व संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे मानले जाते, मात्र धनंजय मुंडे यांना लोकसभा वा विधानसभेची उमेदवारी आणि या २ वर्षांसाठी राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांना संधी दिली जाणार असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा होती. याबाबत अंतिम निर्णय अजित पवार यांचा असणार आहे. पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
भाजपकडून या निवडणुकीत उमेदवार उभा केला जाणार की नाही, याबाबतही उत्सुकता आहे. खासदार मुंडे या निवडणुकीत तगडा उमेदवार देण्याची शक्यताही व्यक्त होते. त्यांच्या भूमिकेचीही उत्सुकता आहे.

Story img Loader