कल्याण डोंबिवली महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे एक कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. यासाठी कंत्राटदारही नेमण्यात आले आहेत. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
कल्याणमधील बाजारपेठेतून लक्ष्मी मार्केट, एस.टी. डेपोच्या दिशेने वाहत जाणाऱ्या नाल्यात गाळाचे ढीग दिसत आहेत. जागोजागी प्लॅस्टिक पिशव्या अडकल्या आहेत. या कामांवर महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने ठेकेदाराची माणसे संथगतीने काम करीत आहेत. कल्याणमधील नालेसफाईच्या कामाकडे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फारसे लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. काही वर्षांपर्यंत मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नालेसफाईची कामे पूर्ण होऊन मेअखेपर्यंत लहान, मोठे गाळे साफ केले जायचे. आता ही परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. कल्याणमधील जरीमरी नाला, डोंबिवलीतील कोपर नाला, गांधीनगर नाला थेट खाडीला जाऊन मिळतात. त्यामुळे या नाल्यांमधील घाण, अडथळे दूर करणे आवश्यक आहे. आयरेगाव नाला, कोपर, गांधीनगर, भोईरवाडी नाल्यांच्या खाडीकडे जाणाऱ्या भागाकडे मोठय़ा प्रमाणात मातीचे भराव टाकून त्यावर चाळी उभारण्यात आल्या आहेत. आयरेगावाच्या बाहेरून गेलेल्या नाल्याचा काही भाग अनधिकृत बांधकामांसाठी कमी करण्यात आला आहे. काही ठिकाणी तो वळविण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेत भोईरवाडी नाल्याच्या खाडीकडे गेलेल्या भागाकडे नाल्याच्या दुतर्फा अनधिकृत चाळींची बांधकामे झाली आहेत. खाडीला भरती आली तर मातीच्या भरावावर उभ्या केलेल्या चाळींचे पाणी नाल्यात येऊन ते पाणी शहरातून वाहून जात असलेल्या सांडपाण्याला अडवून शहरात सांडपाण्याचे तलाव तयार होतील अशी, भीती या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा