नक्षलवाद्यांविरोधात रानावनात लढताना जाडय़ाभरडय़ा चामडी बुटाऐवजी कॅन्व्हॉसचे कापडी बुट घालण्यास गृह मंत्रालयाने सवलत दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे निमलष्करी जवानांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आदींसह नक्षलवादग्रस्त भाग हा घनदाट जंगलाने वेठलेला आहे. नक्षलवाद्यांच्या तसेच त्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या शोधात निमलष्करी दलाच्या जवानांच्या तुकडय़ांना रानावनात फिरावे लागते. जंगलात पक्का अथवा पक्का रस्ता किंवा पायवाट फार कमी वेळेस उपलब्ध होते. माती, काटय़ाकुटय़ातून मैलोन्गणती पायी चालावे लागते. चालताना पायातील जाड चामडय़ाच्या बुटांमुळे अनेकदा अडचणी येतात. खांद्यावर बंदुका वा इतर शस्त्रे, खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन सावधतेने चालतेवेळी जाड बुटांमुळे चालणे जवानांना  कठीण होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी झारखंडमधील नक्षलवादग्रस्त भागाला काही दिवसांपूर्वी भेट दिली. तेथे तैनात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळाची पाहणी करून त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथील जवानांसोबत त्यांनी संवाद साधला.
जंगलात वाटचाल करताना येत असलेले थरारक अनुभव जवानांनी कथन केले. जंगलात प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणीही जवानांनी मंत्र्यांना सांगितल्या. मंत्र्यांनी दिल्लीत परतल्यानंतर गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत या बाबी मांडल्या.
जंगलात गेल्यावर चामडी बुटाऐवजी कॅन्व्हॉसचे कापडी बुट अथवा कुठलेही बुट हे जवान वापरू शकतात. त्यांना त्रास न होता चालणे सुखकारक वाटेल, असे कुठलेही बुट वापरू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे जवानांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आदींसह नक्षलवादग्रस्त भागात केंद्रीय राखीव पोलीस दलासह विविध निमलष्करी दलाचे सुमारे ८२ हजार जवान राज्य पोलिसांसह तैनात आहेत.
एकटय़ा पूर्व महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुमारे सहा हजार जवान तैनात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा