दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सर्वस्पर्शी होते. शेती, उद्योग, कला, साहित्य, शिक्षणासह इतरही क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांचे कर्तृत्व गौरवास्पद होते, असे उद्गार नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी काढले.
स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘कर्तृत्वाचा सह्याद्री’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात डॉ. जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिलीप उके होते. कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील व विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. गणेश िशदे यांची उपस्थिती होती. डॉ. जाधव यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाणांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निर्मितीत यशवंतरावांचा पुढाकार होता. भारतात विश्वकोषाची निर्मिती फक्त महाराष्ट्राने केली व तीही चव्हाणांमुळेच. मुख्यमंत्री निधीची योजनाही त्यांच्याच काळात सुरू झाली, असे डॉ. जाधव म्हणाले. यशवंतरावांना घडवण्यात त्यांची आई विठाबाई यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे उदाहरण देताना डॉ. जाधव म्हणाले, वयाच्या विशीमध्ये मागासवर्गीयांसाठी रात्रशाळा सुरू करण्याची कल्पना यशवंतरावांना सुचली आणि ती त्यांनी अमलातही आणली. त्या शाळेचे उद्घाटन करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलविले होते. पण शिंदे यांनी येण्यास एक अट टाकली, ती म्हणजे त्यांच्यासोबत एक दलित विद्यार्थी येईल. त्यांच्यासमवेत यशवंतरावांच्या घरी जेवण घेईल. यशवंतराव त्यांना घरी घेऊन आले. आईने त्या सर्वाना जेवण दिले व त्या म्हणाल्या, कशाची आली जात-पात. मला सर्व मुले सारखीच. यावरून आईने यशवंतरावांवर केलेले संस्कार दिसून येतात.
यशवंतरावांच्या कार्याचा वसा घेऊन कुलगुरू निधी दत्तक योजना राबवत असल्याचे कुलगुरू डॉ. उके यांनी या वेळी नमूद केले. प्रा. गणेश िशदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. बी. पाटील यांनी आभार मानले.
पारितोषिक वितरण
चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पध्रेचे पारितोषिक वितरण डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. निबंध स्पध्रेत सूर्यकांत पनापले (शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड) यास रोख ३ हजार रुपये व प्रमाणपत्र, शकुंतला सूर्यवंशी रोख २ हजार व अवधूत रेवले यास रोख १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. वक्तृत्व स्पध्रेत सुशील सूर्यवंशी (लातूर) ३ हजार रुपये, साईप्रसाद ढवळे २ हजार व भारत जेठेवाड यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा