शहर परिसरात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पुन्हा तीन दुचाकी चोरटय़ांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस यंत्रणेने आजवर अनेक वाहनचोरांच्या टोळक्यांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे. परंतु हे प्रकार पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाहीत.
द्वारका परिसरात राहणारे संजय ढवळ हे काही कामानिमित्त शालिमार परिसरात आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल परिसरातील वर्तक अपार्टमेंटच्या आवारात लावली. यावेळी चोरटय़ाने त्यांची मोटारसायकल चोरून नेली. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसरी घटना महात्मा गांधी रोडवर घडली. त्र्यंबकरोडच्या दीपनारायण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कल्याणी रानडे महात्मा गांधी रोडवरील अभ्यंकर प्लाझा येथे काही कामासाठी आल्या होत्या. त्यांनी आपली यामाहा ही ५० हजार रुपये किमतीची गाडी त्याच ठिकाणी उभी करून कामासाठी निघून गेल्या. या संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी त्यांची गाडी लंपास केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाहन चोरीची तिसरी घटना सिटी सेंटरच्या मागील भागात घडली. आनंदवली येथील रहिवासी संदीप खलाने यांनी आपली बजाज पल्सर सिटीसेंटरच्या मागील बाजूस लावली होती. अवघ्या तासाभरात ही गाडी काही अज्ञात इसमांनी लंपास केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन घटनांमध्ये एक लाखाहून अधिक किमतीच्या दुचाकी चोरटय़ांनी लंपास केल्या. दरम्यान, शहरातून आजवर शेकडो दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. पोलीस यंत्रणेने या प्रकरणांचा तपास करून अनेक टोळकी चोरीच्या वाहनांसह जेरबंद केली आहेत. अनेक टोळ्यांविरुद्ध कारवाई करूनही वाहन चोरीच्या प्रकारांवर पूर्णपणे नियंत्रण आलेले नाही. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहनचोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

Story img Loader