बाळासाहेबांची प्रकृती अधिकच खालावल्याचे वृत्त बुधवारी सायंकाळी मुंबईत पसरले आणि शिवसैनिकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. अनेकांनी घरासमोरील आकाशकंदील मालवून वांद्रय़ाच्या कलानगरात धाव घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीबाबत काहीच कळत नसल्याने शिवसैनिक कासावीस झाले होते. मातोश्रीच्या आसपास आणि संपूर्ण कलानगर परिसरात बाळासाहेबांच्या चाहत्यांची आणि शिवसैनिकांची तोबा गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत ही सगळी मंडळी अस्वस्थपणे तिथे उभी होती. बाळासाहेबांच्या तब्येतीबाबत ‘आतून’ काहीच कळत नसल्याने एक विचित्र कोंडी वातावरणात निर्माण झाली होती. अखेर मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास उद्धव ठाकरे स्वत:च बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट स्पष्ट उमटले होते. एका पोर्टेबल स्पीकरवरून त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. रात्रभर मातोश्रीबाहेर खडा पहारा देत उभ्या असलेल्या सगळ्यांनी आपला जीव जणू कानात साठविला होता.. बाळासाहेबांची इच्छाशक्ती अफाट आहे, चमत्कारावर आपला विश्वास आहे.. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आणि त्यांना प्रतिसाद देताना वातावरणात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर घुमला. अर्थात, नेहमीसारखा या गजरात उत्साह नव्हता तर काळजीची दाट काजळीच त्या गजरावर साठली होती.
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत ऐकल्यापासून तमाम शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ होते. बुधवारी रात्री त्यांची तब्येत अधिकच खालावल्याचे कणोपकर्णी झाले आणि शिवसेनेच्या शाखांबाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढली. दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी लावलेले आकाश कंदील शिवसैनिकांनी उतरविले. दिव्यांची रोषणाईदेखील मालवली गेली. दादर, वांद्रे परिसरात, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये दिवाळीच्या उत्साहावर चिंतेची काजळी धरली. संध्याकाळपासूनच मातोश्रीचा परिसर गंभीर गर्दीने दाटला होता. रात्र वाढत होती तसतशी मातोश्रीबाहेरच्या गर्दीत भर पडू लागली. महिला, तरुण, वृद्ध मोठय़ा संख्येने भगवा फडकवत ‘मातोश्री’कडे येऊ लागले. पोलिसांनी संपूर्ण कलानगर परिसरातच कडेकोट बंदोबस्त लावला. केवळ बडय़ा नेत्यांनाच ‘मातोश्री’मध्ये प्रवेश देण्यात येत होता.
बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल नेमके कळत नसल्याने काही शिवसैनिक बिथरले आणि त्यांनी ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा घोषणा देत रस्त्यातील वाहनांच्या दिशेने मोर्चा वळवला आणि वाहतूक रोखून धरली. शिवसैनिकांचा उद्रेक पाहून बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही काही काळ धडकी भरली. वातावरण तंग झाले. मात्र काही समंजस कार्यकर्ते भडकलेल्या तरुणांना आवरण्यासाठी पुढे आले. परंतु कुणीच कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शिवसैनिकांच्या उद्रेकाचे वृत्त ‘मातोश्री’मध्ये थडकले आणि नेते अधिकच अस्वस्थ झाले. अखेर उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडावे लागले. ‘शिवसेनाप्रमुखांसाठी प्रार्थना करा, कुणीही हुल्लडबाजी करू नका, संयम बाळगा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
चिंता, काळजी अन पार्थना…
बाळासाहेबांची प्रकृती अधिकच खालावल्याचे वृत्त बुधवारी सायंकाळी मुंबईत पसरले आणि शिवसैनिकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. अनेकांनी घरासमोरील आकाशकंदील मालवून वांद्रय़ाच्या कलानगरात धाव घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीबाबत काहीच कळत नसल्याने शिवसैनिक कासावीस झाले होते.
First published on: 16-11-2012 at 03:41 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Care and pray for balasaheb thackrey from all