दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत ऐकल्यापासून तमाम शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ होते. बुधवारी रात्री त्यांची तब्येत अधिकच खालावल्याचे कणोपकर्णी झाले आणि शिवसेनेच्या शाखांबाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढली. दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी लावलेले आकाश कंदील शिवसैनिकांनी उतरविले. दिव्यांची रोषणाईदेखील मालवली गेली. दादर, वांद्रे परिसरात, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये दिवाळीच्या उत्साहावर चिंतेची काजळी धरली. संध्याकाळपासूनच मातोश्रीचा परिसर गंभीर गर्दीने दाटला होता. रात्र वाढत होती तसतशी मातोश्रीबाहेरच्या गर्दीत भर पडू लागली. महिला, तरुण, वृद्ध मोठय़ा संख्येने भगवा फडकवत ‘मातोश्री’कडे येऊ लागले. पोलिसांनी संपूर्ण कलानगर परिसरातच कडेकोट बंदोबस्त लावला. केवळ बडय़ा नेत्यांनाच ‘मातोश्री’मध्ये प्रवेश देण्यात येत होता.
बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल नेमके कळत नसल्याने काही शिवसैनिक बिथरले आणि त्यांनी ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा घोषणा देत रस्त्यातील वाहनांच्या दिशेने मोर्चा वळवला आणि वाहतूक रोखून धरली. शिवसैनिकांचा उद्रेक पाहून बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही काही काळ धडकी भरली. वातावरण तंग झाले. मात्र काही समंजस कार्यकर्ते भडकलेल्या तरुणांना आवरण्यासाठी पुढे आले. परंतु कुणीच कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शिवसैनिकांच्या उद्रेकाचे वृत्त ‘मातोश्री’मध्ये थडकले आणि नेते अधिकच अस्वस्थ झाले. अखेर उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडावे लागले. ‘शिवसेनाप्रमुखांसाठी प्रार्थना करा, कुणीही हुल्लडबाजी करू नका, संयम बाळगा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा