माणूस आजारी पडला, अपघातात सापडला तर त्याला लगेच वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याकडे आपला कल असतो. तोच एखादा कुत्रा, त्याचे पिल्लू आजारी असले ते वाहनाखाली जखमी झाले तर त्याची देखभाल तेवढय़ा तत्परतेने केली जात नाही. बदलापूर जवळ राहाणाऱ्या शामला राव यांनी अशा शेकडो अनाथ श्वानांना आश्रय देत त्यांची काळजी घेण्याचे व्रत उचलले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भटकी, जखमी कुत्र्यांचा सांभाळ शामला राव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सुरू आहे.
राव कुटुंब मूळचे मंगलोरचे (कर्नाटक). नोकरीनिमित्त नायगाव-चिंचोटी(वसई) येथे राहते. प्राणी सेवा ही एक ईश्वर, देशसेवा आहे. या विचार, संस्कारातून वाढलेले राव कुटुंब यापूर्वी चांदप येथील गोशाळेच्या जागेत परिसरातील जखमी कुत्र्यांचा सांभाळ करत असत. तेथील जागा अपुरी पडल्यामुळे तसेच कुत्र्यांची संख्या वाढू लागल्याने राव कुटुंबीयांनी बदलापूरजवळील राहटोलीपासून चार किलोमीटर अंतरावरील चोण गावातील एका फार्म हाऊसमध्ये भाडय़ाने जागा घेतली. गेल्या वर्षभरापासून तेथे २५० श्वानांचा कुटुंबकबिला घेऊन शामला राव एकटय़ा राहतात. सोबतीला राजेश जामदार हा एक कामगार असतो. ट्रक, बसखाली सापडून अपंग झालेल्या कुत्र्यांची व्यवस्था या ठिकाणी पाहिली जाते. अशा कुत्र्यांना शोधून आणणे, त्यांच्यावर उपचार करून बरे करणे, असे काम तेथे केले जाते. ज्या नागरिकांना हे श्वानांचे ‘केअर सेंटर’ माहिती आहे. ती मंडळी कुत्र्यांना आणून सोडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्वानांचे भोजन
२५० कुत्र्यांना दररोज १० ते १५ किलो मटन लागते. ५० किलो तांदूळ लागतो. काही ओळखीच्या व्यक्ती कुत्री आणून सोडतात. खर्चासाठी काही रक्कम देतात. त्यामधून दिवस खर्च भागवला जातो. शामला राव एका बहुद्देशीय राष्ट्रीय कंपनीत नोकरीला होत्या. काही वर्षांपूर्वी कार्यालयात जाताना त्यांना एक कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली सापडून मेल्याचे दिसले. ही दुर्दैवी घटना त्यांच्या मनाला चटका लावून गेली. नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर भटकी, अनाथ, जखमी कुत्र्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षांपासून नायगाव येथे हा उपक्रम सुरू होता. शामला यांचे पती सिमेन्स कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. मुलीने बारावीची परीक्षा दिली आहे. नायगाव भागातील कुत्र्यांची देखभाल पती करतात. बदलापूरजवळील २५० श्वानांचा कबिला शामला राव सांभाळतात. भटकी, बरी झालेली कुत्री सोडून दिली तर त्यांना बाहेरची कुत्री चावतात, त्रास देतात. ही सगळी कुत्री सोडून दिली तर बाहेर ती कशी राहतात यावर लक्ष कोण ठेवणार, असा प्रश्न शामला राव यांनी उपस्थित केला.