जिल्ह्य़ात पाऊस अवर्षण व दुष्काळाचा जबरदस्त फटका फळबागांना बसला आहे. पाच तालुक्यातील संत्रा, मोसंबी, द्राक्ष, लिंब, पेरू, केळी व अन्य फळबागा वाळण्यास व करपण्यास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना या फळबागा तोडण्याशिवाय दुसरे गत्यंतर उरलेले नाही. जीवापाड कष्टाने जोपासलेल्या या बागा डोळ्यादेखत उध्वस्त होतांना शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. वाळलेल्या फळबागांमुळे हजारो शेतक ऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
संपूर्ण जिल्हाभर यावर्षी अत्यल्प पावसाने काहूर माजविले आहे. जिल्ह्य़ात सरासरी आठशे मिलीमीटर पाऊस पडतो. सरकारी आकडे काहीही सांगत असले तरी जिल्ह्य़ातील अकरा तालुक्यात तिनशे मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला नाही. त्यावर केवळ पन्नास टक्के उतारा लागलेली खरीप पिके तेवढी शेतकऱ्यांच्या हाती लागली. रब्बी पिकांची पेरणीच झाली नाही. आता फळबागांचे मातेरे होऊ लागले आहे.
मोताळा तालुक्यातील कोल्ही गोल्हर, पिंपळगाव देवी, लिहा, आव्हा, युनूसपूर, गुगळी, उऱ्हा, दहीगाव, चिंचखेड व परिसरातील फळबागा करपल्या असून आता त्या तोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या फळबागांमध्ये प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू व केळी अशा फळबागांचा समावेश आहे. दहीगावचे शेतकरी बाजीराव शेळके, लिहा येथील ज्ञानदेव सपकाळ, कोल्ही येथील नारायण मुंदोकार, तुकाराम थिटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या फळबागा उध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आता या फळबागा तोडण्याच्या मजुरीसाठी पैशाची मारामार असल्याचे ते म्हणाले. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावराजा, तुळजापूर, गोळेगाव, दुसरबीड व किनगावराजा परिसरात हीच परिस्थिती आहे. देऊळगावराजा येथील अशोक तुकाराम रामाणे यांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेली दोन हेक्टर मोसंबीची बाग वाळू लागल्याने संपूर्णपणे तोडून टाकली आहे. तुळजापूरचे बाजीराव जाधव यांची द्राक्षाची बाग, संजय क ोल्हे यांची मोसंबीची बाग, गजानन कोल्हे यांची मोसंबीची बाग पूर्णपणे करपली आहे. या बागा तोडण्याचे काम सुरू असल्याचे त्या शेतकऱ्यांनी सांगितले.
मोताळा व देऊळगावराजासारखी भयावह परिस्थिती बुलढाणा, चिखली, मेहकर या तालुक्यात असून अनेक गावच्या फळबागा वाळल्या आहेत. त्यामुळे या फळबागा तोडण्यास शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. यासंदर्भात करपलेल्या व वाळलेल्या फळबागांचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ाच्या धर्तीवर मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय गायकवाड, चिखलीचे भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश अप्पा कबुतरे यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन खात्याच्या सभापती लक्ष्मी नरेश शेळके यांनी वाळलेल्या फळबागांचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. वाळलेल्या फळबागांची पाहणी करण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी येत नसल्याबद्दल   संबंधित   शेतकऱ्यांनी   प्रचंड रोष व्यक्त केला.