देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी येथे कामगार व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत सायकल व मोटरसायकल फेरी काढण्यात आली. पहिल्या दिवशी असलेली संपाची तीव्रता दुसऱ्या दिवशी काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. बँकामध्ये गुरूवारी बऱ्यापैकी उपस्थिती दिसून आली. दरम्यान दोन दिवसांच्या संपामुळे कंपन्यांचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, निर्गुंतवणूक यांच्यावर नियंत्रण आणण्यासह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने देशभरात दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. या संपात नाशिकच्या सातपूर, अंबड या औद्योगिक क्षेत्रातील निम्म्यापेक्षा अधिक कामगारांनी सहभाग घेतल्याने त्याचा कामावर परिणाम झाला. संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आला असला तरी औद्योगिक संघटनांनी संमिश्र परिणाम झाल्याचे सांगितले. बँकांमध्येही आदल्या दिवशीच्या तुलनेत उपस्थिती बऱ्यापैकी वाढली. आदिवासी विकास कार्यालयासह इतर अनेक सरकारी कार्यालयांमध्ये मात्र तुरळक उपस्थिती होती.
सातपूर औद्योगिक वसाहतीपासून दुपारी कामगारांची सायकल व मोटरसायकल फेरी काढण्यात आली. या फेरीच्या अग्रभागी सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड हे स्वत: सायकलीवर स्वार झाले होते. फेरीत सहभागी कामगार विविध घोषणा देत होते. नाशिकमध्ये संप कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले. दोन दिवसांच्या संपामुळे औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कामकाज ठप्प झाल्याने कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संपामुळे औद्योगिक क्षेत्रात कोटय़वधींचे नुकसान
देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी येथे कामगार व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत सायकल व मोटरसायकल फेरी काढण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carods of rupees loss of industry sector due to strike