उसने घेतलेले पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी एका ३६ वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या महेश धोंडीबा देठे याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महेशची पत्नी वैशाली हिला सहआरोपी करण्यात आले आहे. देठे दाम्पत्य पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील बदलापूर येथील मोहनानंदनगरमध्ये पीडित महिला राहत असून या महिलेची आणि तिच्या पतीची देठे दाम्पत्यासोबत ओळख झाली होती. यातूनच त्याने पीडित महिलेच्या पतीकडून ७५ हजार आणि नणंदेकडून ३ लाख ५० हजार रुपये उसनवारी घेतले होते. दरम्यान, महेशने पीडित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच मोबाइलद्वारे तिची अश्लील चित्रफीत काढून ती लोकांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करून त्याने तिच्याकडून आणखी दीड लाख रुपये घेतले. दरम्यान, पीडित महिलेच्या पतीकडून आणि नणंदेकडून घेतलेले उसनवारी पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी त्याने पीडित महिलेची अश्लील चित्रफीत प्रसारित करून तिची नातेवाईक व मित्र परिवारामध्ये बदनामी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader