ट्रकमधून उघडय़ावर कचऱ्याची वाहतूक करणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंगलट आले असून या प्रकरणी नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संतोष पाचलग यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी महापालिकेच्या घनकचरा निर्मूलन व्यवस्थापन अधिकाऱ्यासह कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकरणात थेट महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असून या गुन्ह्य़ातील आरोप सिद्ध झाल्यास अधिकारी आणि कंत्राटदाराला सहा महिन्यांची शिक्षा अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षेला समोरे जावे लागेल. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२१ व्या शतकातील सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. मात्र प्रशासनाच्या भोंगळ आणि ढिसाळ कारभारामुळे ही प्रतिमा डागळत आहेत. आलिशान मुख्यालयासाठी करोडो रुपये खर्च करणाऱ्या या नवी मुंबई महापालिकेत कचऱ्याची वाहतूक मात्र ट्रक आणि जीपमधून उघडय़ावर होत असल्याचे विदारक चित्र शहरात पाहायला मिळत होते. अ‍ॅन्थोनीसोबतचा कचरा वाहतुकीचा ठेका संपुष्टात आल्यानंतर नव्या ठेकेदाराच्या नेमणुकीचा प्रस्ताव वादात अडकल्याने तो बारगळा आहे. यामुळे कचरा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर स्थानिक कचरा सफाई ठेकेदारांना मारून-मुटकून कचरा उचलण्याचे काम करून घेण्याची शक्कल अधिकाऱ्यांनी लढवली. हे ठेकेदार ट्रक किंवा जीपमधून कचऱ्याची उघडय़ावर वाहतूक करीत होते. नियमाप्रमाणे बंद वाहनातूनच कचरा वाहतूक करणे बंधनकारक असताना, नियमांची पायमल्ली करीत ही वाहतूक सुरू होती. उघडय़ावर वाहतूक होत असल्याने वाहनातून अनेकदा रस्त्यावर कचरा पडत होता. त्याचप्रमाणे परिसरात मोठय़ा प्रमाणात दरुगधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रकरणी पाचलग यांनी जानेवारीमध्ये महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. यात महापालिकेकडून उघडय़ावर ट्रकमधून कचरा वाहून नेत असल्याने दरुगधी पसरत असून संसर्ग रोगांचा फैलाव होत आहे. तसेच कचरा जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, बूट आदी मूलभूत साहित्याचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्यादेखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वारंवार सूचना करूनदेखील अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत कोणतीच उपाययोजना न केल्याने पाचलग यांनी बुधवारी या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कलम भादंवि २६९, ३४ अंतर्गत हेतुपुरस्सर किंवा निष्काळजीपणे साथीचे रोग पसरविण्यासाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब रांजळे यांच्याशी संपर्क साधला असता, या तक्रारीची पूर्ण माहिती घेऊनच काही बोलणे योग्य ठरेल. त्याचप्रमाणे योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

२१ व्या शतकातील अत्याधुनिक शहर असलेल्या श्रीमंत महापालिकेचा हा प्रकार लांच्छनास्पद आहे. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. कचऱ्याच्या उघडय़ावरील वाहतुकीमुळे शहरात साथीच्या रोगांनी उच्छाद मांडला असून याला महापालिका अधिकारीच जबाबदार आहेत
-संतोष पाचलग, सरचिटणीस, भाजप, नवी मुंबई</strong>

Story img Loader