हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आणि मूळ फिर्यादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. मुंगळे यांनी दिले आहेत. या साक्षींमुळे खटल्याला कलाटणी मिळून पुराव्याअभावी संशयिताची मुक्तता झाली. तपासी अंमलदार असलेल्या नंदवाळकर यांनी या प्रकरणात केलेल्या एकुणच तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढले.
तालुक्यातील येसगाव येथील मुरलीधर वामन सैंदाने या वृध्दाचा गंभीर जखमी झाल्याने ५ जून २०११ रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी वृध्दाची सून साधना भालचंद्र सैंदाणे यांनी दुसऱ्या दिवशी तालुका पोलीस ठाण्यात तिचा पती भालचंद्र याने केलेल्या मारहाणीमुळे आपल्या सासऱ्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली होती. दारू पिऊ नको व कामधंदा कर असे सांगण्याचा राग आल्यामुळे भालचंद्रने आपल्या पित्याचे डोके धरून आपटले व त्यात गंभीर जखमी झाल्याने हा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले होते.
या फिर्यादीनुसार तालुका पोलीस ठाण्यात भालचंद्रविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. खटल्याच्या सुनावणीत अकरा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार मयताच्या डोक्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र खटल्यातील मूळ तक्रारदार फितूर झाले. आपल्या सासऱ्याला चक्कर येऊन पडल्याने झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे तसेच घटना घडली तेव्हा पती भालचंद्र घरी देखील नसल्याची साक्ष तिने न्यायालयात दिली. शिवाय तपासी अंमलदार पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर यांनीही न्यायालयात खोटी साक्ष दिली. संशयिताचे रक्ताने माखलेले कपडे त्याला पोलीस ठाण्यात आणल्यावर जप्त केल्याचे पंचनाम्याच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असताना संशयीताच्या घरातून झडती घेताना हे कपडे जप्त केल्याचे नंदवाळकर यांनी साक्षीत म्हटले. ही विसंगती स्पष्टपणे दिसत असताना उलट तपासणीतही ते आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. या साक्षीमुळे संशयिताला फायदा झाला व पुराव्याअभावी त्याची न्यायालयात मुक्तता केली. मात्र नंदवाळकर व संशयिताची पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.किशोर राकावट यांनी बाजू मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा