राज्य शेळीमेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते रामराव वडकुते यांची विवाहित कन्या वैशाली थोरात हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी रात्री पुणे येथे राहत्या घरी आढळून आला. दरम्यान, वैशालीने आत्महत्या केली नसून पती विजयनेच तिचा खून केल्याची तक्रार दिल्यावरून पुण्याच्या पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वडकुते यांची कन्या वैशालीचा विवाह विजय थोरात याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. विजय हा पुणे येथे खासगी कंपनीत काम करीत होता. रविवारी रात्री विजय व वैशालीचे भांडण झाल्याची माहिती परभणीत वडकुते यांना मिळाली. त्यानंतर वैशालीचा गळफास लावलेला मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. त्यामुळे वडकुते कुटुंबीयांनी पुण्याकडे धाव घेतली. सोमवारी सकाळी वैशालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह परभणीस आणण्यात आला.
दरम्यान, वैशालीच्या मृत्यूनंतर पती विजयने स्वत:ला ब्लेड मारून जखमी करून घेतले. सध्या तो पुण्यात रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती पुण्याचे सहायक पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.     

Story img Loader