महा लोकअदालतींमध्ये दीड लाखावर खटले निकाली
प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने महा लोकअदालतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या संधीला पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नागपूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या पाच महा लोक अदालतींमध्ये १ लाख, ७३ हजारांवर खटले निकालात निघाले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये आतापर्यंत महा लोक अदालतींच्या माध्यमातून १० लाखांपेक्षा अधिक प्रकरणे सोडविण्यात आली आहे. नागपुरातील पाच महा लोकअदालतींमध्ये दाखल झालेल्या २ लाख, ९५ हजार, ८१८ प्रकरणांपैकी १ लाख, ७३ हजारांवर खटले निकालात निघाले आहेत. या पाच महा लोकअदालतींमध्ये १ लाख, ६० हजार, ४१२ प्रलंबित प्रकरणे दाखल झाली झाली. यातील ९७ हजार, ७०४ प्रकरणे निकालात निघाली. १ लाख, ३५ हजार, ४०६ दाखलपूर्व प्रकरणांपैकी ७४ हजार, १०२ प्रकरणे निकालात निघाली.
न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे महा लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधितांनी त्या न्यायालयात अर्ज करावा व दाखल पूर्व प्रकरणांबाबत जिल्हा विधि सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधि सेवा समितीकडे कर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाने केले आहे.

महा लोकअदालत २२ सप्टेंबरला
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्यावतीने नागपूर जिल्ह्य़ात २२ सप्टेंबर २०१३ रोजी महा लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये दिवाणी दावे, भू-संपादनसंबंधीची प्रकरणे, तडजोडीयोग्य प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रकरणे कामगारांविषयीची प्रकरणे, बाल गुन्ह्य़ासंबंधीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्या देखरेखीखाली ही प्रकरणे मिटविण्याकरिता न्यायालयातील कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. अधिक माहितीसाठी पक्षकारांनी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायमंदिर, नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश सुभाष मोहोड व प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी केले आहे.ह्ण

Story img Loader