जी. के. गुजर ट्रस्टच्या डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतर्गत काजू कटिंग मशिन (कॅश्यू नट कटिंग मशिन) व बेदाणानिर्मिती सौरयंत्र (सोलर ग्रेप ड्रायर) तयार केले आहे. या यंत्राचा शेतक ऱ्यांना मोठा फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधनाचे औद्यागिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी अनेक उपकरणे बनवली आहेत. यात यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्राध्यापक वैभव रंगाटे व प्राध्यापक सरफराज मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी काजू कटिंग मशिन (कॅश्यू नट कटिंग मशिन) व बेदाणानिर्मिती सौरयंत्र (सोलर ग्रेप ड्रायर) प्रकल्प तयार केले आहेत. पूनम साळोखे, संजय बंडगर, अवधूत पाटील व तानाजी करचे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या काजू कटिंग मशिनच्या पारंपरिक उपकरणामध्ये शेतकऱ्यांना प्रक्रियेसाठी जास्त वेळ लागत होता. तसेच अपघात घडण्याची शक्यताही जास्त होती. परंतु या उपकरणामुळे प्रक्रियेसाठी लागणारा वेळ हा कमी झाला असून, उत्पादनक्षमता दीडपटीने वाढली आहे.
या प्रकल्पासाठी शिवबळ इंडस्ट्रीज प्रा. लि. तासगाव यांनी अर्थसाहाय्य केले आहे. बेदाणानिर्मिती सौरयंत्र प्रकल्प हा दीपाली पाटील, पूनम देवाडिगा, प्राजक्ता शिंदे व सुप्रिया बिचकर या विद्यार्थिनींनी केला असून, या यंत्राच्या साहाय्याने आपण सौरऊर्जेचा वापर करून १४ ते १५ तासांच्या कालावधीमध्ये द्राक्षांपासून बेदाणानिर्मिती करू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये या प्रक्रियेला ८ ते १० दिवस लागत आहे. या यंत्राद्वारे शेतकरीवर्गाचे वेळ व श्रम वाचणार आहेत. विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, उपाध्यक्ष इंद्रजित गुजर, सचिव डॉ. माधुरी गुजर, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Story img Loader