काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अॅड. व्यंकट बेद्रे यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल विभागीय जात पडताळणी समितीच्या वतीने देण्यात आला. या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बेद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लातूर महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या राखीव प्रभागातून बेद्रे यांनी विजय मिळविला. प्रतिस्पर्धा उमेदवार शिवप्रसाद शृंगारे यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विभागीय जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र तपासणीस प्रकरण वर्ग केले होते.
या समितीने सोमवारी सायंकाळी निकाल जाहीर केला. दरम्यान, आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या निमित्ताने संपूर्ण समाजालाच न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे बेद्रे यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा