शाळेच्या दाखल्यातून जात हद्दपार होणे गरजेचे असून जाती व्यवस्था संपली पाहिजे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीने मंगळवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ‘जातीअंत निर्धार परिषद’ झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भालचंद्र कानगो, प्रा. अजित अभ्यंकर, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, कॉम्रेड श्रीधर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. अॅड. आंबेडकर यांनी राज्यात जातीअंत चळवळ सर्वदूर पोहचणे गरजेचे असल्याचे मत मांडले. सरकारने १४ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले आहे. त्यात बदल करत ते १० वीपर्यंत सक्तीचे करण्याची मागणीही त्यांनी केली. अंनिसचे अविनाश पाटील यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला. पुरोगामी विचारसरणीवर वेळोवेळी होणाऱ्या हल्ल्याांच्या पाश्र्वभूमीवर समविचारी संघटनांनी एकत्रित येत राज्यात प्रत्येक जिल्हयात एल्गार पुकारण्यात येत आहे. मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी समविचारी संघटनांच्या वतीने राज्य सरकार या हल्ल्यास कसे जबाबदार आहे याची जाणीव करून देण्यात येत आहे. तसेच एका चतुसूत्री कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला ‘निर्भय मॉर्निग वॉक’ सुरू करण्यात येणार आहे. पानसरे-दाभोलकर व्याख्यानमाला सुरू करून प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला राज्यात सर्वत्र मान्यवरांची व्याख्याने होतील.
काही सकारात्मक उपक्रमांसह समाज प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी साधक बाधक चर्चा, अशा उपक्रमांची आखणी करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. अभ्यंकर यांनी पुरोगामी महाराष्ट्रात दाभोलकर आणि पानसरे यांची झालेली हत्या राज्याच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणारे असल्याचे मांडले. आजही आपल्या मनातून जात पुसली गेलेली नाही. आज जात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तव झाले असून ते समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘भूसंपादन विधेयकाला विरोध’ करणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अॅड. आंबेडकर यांच्या हस्ते अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांना कॉ. मनोहर उर्जा युवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. वसुधा कराड यांनी प्रास्ताविक केले. राजू देसले यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा