नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचे कामकाज आता दोन पाळ्यांमध्ये होणार आहे. शासकीय कार्यालयातील कामकाज दोन पाळ्यात करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल आहे.
रेल्वे, टपाल, दूरसंचार, आरोग्य, पोलीस आदी मोजक्या शासकीय खात्यांमध्ये दिवस-रात्र कामकाज चालते. इतर शासकीय कार्यालयात मात्र केवळ दिवसपाळीत काम होते. शासकीय कार्यालयातील कामाची गती पाहता ‘सरकारी काम काही महिने थांब’ असे लोक उपहासाने म्हणू लागले. मात्र, जनतेच्या कामाचे महत्त्व अधिकाऱ्यांना पटू लागले आहे. जात प्रमाणपत्रांची संख्या आणि त्यांच्या पडताळणीस लागणारा वेळ पाहता कामकाज दोन पाळीत करण्याची गरज अधिकाऱ्यांनी ओळखली आहे. या विभागाचे कामकाज दुपाळीत होणार असून दोन-तीन दिवसात त्यास प्रारंभ होणार आहे. आठ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये कामकाज होईल. विभागीय उपायुक्त एस. जी. गौतम यांनी ही माहिती दिली. त्यांनी यासंबंधी पाठविलेल्या प्रस्तावास पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मंजुरी दिली आहे.
तूर्त दुसऱ्या पाळीत काम करण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी मिळाली आहे. लघुलिपिक, स्वीय सहायक व लघुलिपिक तसेच एक चपराशी ही तीन पदे आहेत. सेवानिवृत्त आणि संगणकीय कौशल्य जाणणाऱ्या बेरोजगाराला नियुक्त केले जाणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ तसेच दुपारी साडेतीन ते रात्री साडेअकरा अशा कामाच्या दोन पाळ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या पाळीत काम करण्यास काही महिलांनीही संमती दर्शविली आहे.
दरम्यान, आता शासकीय कार्यालयांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाचा त्रास होऊ लागला असून तीस टक्के कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करावे लागत आहे. दुपाळीची संकल्पना अनेक शासकीय प्रकल्प तसेच कामांना पूर्ण करण्यासाठी लाभदायी ठरू शकते. गोसीखुर्द पुनर्वसन पॅकेज वितरण हे त्याचे उत्तम उदाहरण ठरू शकते. जात पडताळणी विभागातील हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतरही शासकीय विभागांमध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

Story img Loader