नागरिकांकडून गहाळ झालेले मोबाइल संच मूळ मालकाला परत न देता अप्रामाणिकपणे त्या मोबाइल संचांचा वापर करणा-या बारा जणांचा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध लावला असून, या सर्वाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात मोबाइल संच गहाळ होण्याचे, चोरी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी त्यावर आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबर गुन्हे विभागाच्या यंत्रणेकडून गहाळ मोबाइलचा शोध घेतला असता त्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गहाळ मोबाइलचा अप्रामाणिकपणे वापर करणा-या मंडळींना पकडले. त्यांच्याकडून गहाळ मोबाइल संचही जप्ता करण्यात आले आहेत. काशिनाथ शिवराया कलशेट्टी (वय ४०, रा. वेणुगोपाळनगर, कुमठा नाका, सोलापूर), अप्पू सुरेश बनसोडे (वय ३०, रा. कुमठा नाका), गोविंद अंबादास पासकंटी (रा. कर्णिकनगर, चिदानंद अपार्टमेट, सोलापूर), राहुल बाबू बोराडे (वय १९, रा. साईनाथनगर, नई जिंदगी चौक, सोलापूर), आरीफ असगर मोतीवाले (वय २५, रा. नई जिंदगी चौक), प्रताप हसाबवाले, सतीश सोनवणे (रा. संजयनगर, कुमठा नाका), महेश दशरथ वाघमारे (रा. मुस्लिम पाच्छा पेठ), राहुल धोंडिबा गायकवाड (रा. तक्षशिला नगर, कुमठा नाका), गौसपाक शेख (रा. शिवाजी मराठी विद्यालयाजवळ, सोलापूर), अनमोल किशोर लकडे (रा. उत्तर कसबा, टिळक चौक), दत्तात्रेय भालेकर (रा. नवी पेठ) व मझहर झाकीर शेख (रा. सोरेगाव, एसआरपी वसाहत) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सर्वाविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे व नितीन खाडगे यांच्यासह फौजदार सचिन गायकवाड, पोलीस शिपाई कृष्णात जाधव, संतोष येळे, मिलिंद मिठ्ठापल्ली यांच्या पथकाने ही कारवाई केली.