पासपोर्ट कार्यालये, सीजीएचएस दवाखाने तसेच रेल्वेच्या दोन आरक्षण केंद्रांवर सोमवारी सीबीआयच्या पथकांनी अचानक धडकून तपासणी केली. या तपासणीचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
सेमिनरी हिल्सवरील केंद्रीय पारपत्र कार्यालय, सीजीएसएचचे सिव्हिल लाईन्स व सेमिनरी हिल्सवरील दवाखाने तसेच रेल्वेची मोतीबाग व अजनीमधील आरक्षण केंद्रांवर सोमवारी सकाळी सीबीआयची पथके अचानक धडकली आणि तपासणी सुरू केली. सीबीआयच्या या आकस्मिक तपासणीमुळे तेथे खळबळ उडाली. या पथकांनी पारपत्र कार्यालयात विविध कागदपत्रे तपासली. सीजीएचएस दवाखान्यांमध्ये औषधे साठा तपासला. आरक्षण केंद्रांवर आरक्षणाते अर्ज, झालेले आरक्षण तसेच रक्कम यांची तपासणी केली, असे सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकांनी ही तपासणी केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनींवर दिवसभर सुरू असले तरी त्यावर प्रतिसाद मात्र मिळत नव्हता. सीबीआयकडून अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यात प्रशासनाचेही सहकार्य असल्याची तक्रार मध्यंतरी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला मिळाली होती. रेल्वेच्या दक्षता विभागाने काही दलालांना काही दिवसांपूर्वी अटकही झाली होती. या पाश्र्वभूमीवर सीबीआयने ही तपासणी केली. विविध केंद्र शासकीय कार्यालयातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने सीबीआयची ही नियमित तपासणी होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा