जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विविध उपाय योजणाऱ्या निवडणूक यंत्रणेने संवेदनशील अशा निवडक १५ मतदान केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित केले आहे. मागील निवडणुकीत ज्या केंद्रांवर काही गोंधळ वा गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी झाल्या होत्या, बहुदा ती केंद्रे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या टप्प्यात आणली जातील. मतमोजणीप्रसंगी सीसी टीव्ही यंत्रणेचा नेहमीच वापर केला जातो. परंतु, नाशिक व दिंडोरी मतदारसंघात मतदानावेळी प्रथमच या यंत्रणेद्वारे संबंधित केंद्रातील घडामोडींवर नजर ठेवून अनुचित प्रकारांना लगाम घातला जाणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सीसी टीव्ही यंत्रणेचा वापर. यंदा मतदानावेळी पहिल्यांदा त्यांचा वापर होणार आहे. जिल्ह्यात एकूण ४,१९१ मतदान केंद्र असून त्यातील नाशिक लोकसभा मतदार संघात १६६४, दिंडोरीमध्ये १७५० तर धुळे मतदार संघात ७७७ केंद्रांचा समावेश आहे. त्यातील ६४ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ४२ मतदान केंद्र ही एकटय़ा नाशिक मतदार संघातील आहेत. त्या तुलनेत दिंडोरी व धुळे लोकसभा मतदार संघात अशा केंद्रांची संख्या कमी आहे. मतदारांना धमकाविले जाईल वा मतदानासाठी प्रतिबंध केला जाईल, असे एकही केंद्र जिल्ह्यात नसल्याने यंत्रणेने आधीच म्हटले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भालेकर हायस्कूलच्या मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याची तक्रार केली गेली होती. या केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद-विवादही झाले. त्याची परिणती शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या तोडफोडीत झाली. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे सायंकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे मतदान केंद्रच ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याची तक्रार शिवसेनेने केली. इतर मतदान केंद्रांबद्दल काही किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी झाल्या होत्या. यंदा मतदानावेळी असे काही प्रकार घडू नयेत, याकरिता निवडणूक यंत्रणेने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा पर्याय निवडला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या मोठी आहे. प्रत्येक केंद्रावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे अवघड आहे. त्यामुळे त्यातील किमान १५ केंद्रांवर मतदानाच्या दिवशी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे उपरोक्त केंद्रातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवली जाईल. ही यंत्रणा कार्यान्वित करणे खर्चिक बाब असल्याने यंत्रणेने यंदा हा प्रयोग काही मोजक्याच केंद्रावर करण्याचा निर्णय घेतला आहे.
संवेदनशील मतदान केंद्रांवर ‘सीसी टीव्ही’ची नजर
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विविध उपाय योजणाऱ्या निवडणूक यंत्रणेने संवेदनशील अशा निवडक १५ मतदान केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-04-2014 at 02:57 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cc tv fit to watch sensitive polling centers