प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, बस कुठे आहे आणि ती थांब्यावर कधी येणार याची माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळावी यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, तर प्रवास सुकर व्हावा म्हणून केवळ दिसायला चकाचक अशी नवी आसने बसमध्ये बसविण्यात आली; पण आजघडीला तब्बल ८० टक्के बसगाडय़ांमधील कॅमेरे बंद पडले असून २९०० गाडय़ांमधील आसने डुगडुगत आहेत, तर एकाही प्रवाशाला आजतागायत बस कुठे आहे आणि ती किती वेळात थांब्यावर पोहोचणार हे समजलेच नाही. या अपयशी योजनांमुळे तोटय़ातील बेस्टचे पैसे वाया गेले आणि त्याचा थेट फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. आता सत्ताधारी शिवसेनेनेच त्याविरुद्ध हत्यार उपसले असून अपयशाचे खापर प्रशासनावर फोडण्यास सुरुवात केली आहे.
प्रवाशांच्या सुविधेचे कारण पुढे करीत अट्टहासाने बेस्ट प्रशासनाने बसगाडय़ांमधील आसने बदलली, परंतु या तकलादू आसनांमुळे प्रवाशांना त्यावर धड बसताही येत नाही. बेस्टच्या ताफ्यातील सुमारे चार हजार बसगाडय़ांमधील बऱ्याचशा आसने डुगडुगू लागली आहेत. परिणामी बेस्ट बसमध्ये बसण्यापेक्षा उभ्याने प्रवास केलेला बरा, अशी प्रवाशांची भावना बनली आहे.
बेस्टने मोठा गाजावाजा करीत बसगाडी कुठपर्यंत आली याचा अंदाज मोबाइलवर घेता यावा यासाठी एक योजना सुरू केली होती. प्रत्येक बस थांब्यावर नमूद केलेल्या क्रमांकाच्या आधारे बसगाडी कुठपर्यंत पोहोचली आहे, किती वेळात थांब्यावर पोहोचेल याचा अंदाज प्रवाशांना मोबाइलवरून घेता येईल, अशी टिमकी वाजवत बेस्टने ही योजना कार्यान्वित केली. बहुसंख्य बस थांब्यांवर क्रमांक नमूद करण्यात आले; परंतु बेस्टची बस कुठपर्यंत पोहोचली आणि थांब्यावर पोहोचण्यास तिला किती वेळ लागेल हे एकाही प्रवाशाला आजतागायत समजू शकले नाही.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेस्टने आपल्या बसगाडय़ांमध्ये कॅमेरे बसविले; परंतु खड्डेमय रस्ते आणि बसचालकाचे बेदरकारपणे भरधाव वेगात गाडी हाकणे यामुळे हादरे सहन न करू शकलेले कॅमेरे अल्पावधीतच नादुरुस्त बनू लागले. तसेच कॅमेरामध्ये चित्रित झालेली बसगाडय़ांमधील दृश्ये किती काळ साठवून ठेवायची, हा प्रश्न बेस्टला भेडसावू लागला. त्यामुळे एखाद्या महिलेवर अतिप्रसंग घडल्यानंतर अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यावर बसमधील कॅमेरातील चित्रीकरण मिळेलच याची शाश्वती नाही. आता तर बहुतांश गाडय़ांमधील कॅमेरे बंदच पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
बेस्ट समितीच्या मंजुरीने प्रशासनाने एकामागून एक अशा या योजनांची अंमलबजावणी केली. आता सत्ताधारी शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक सुहास सामंत यांनी या योजनांबाबत बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेस्टच्या ४००० बसगाडय़ांमधील डुगडुगणाऱ्या आसनांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी वव्र्ह कंपनीवर सोपविली आहे; पण आजपर्यंत केवळ ११०० गाडय़ांतील आसनांची दुरुस्ती झाली आहे. उर्वरित तब्बल २९०० बसगाडय़ांमधील डुगडुगणाऱ्या आसनांवर बसून त्रास सहन करीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. या कंपनीला २०२० पर्यंत कंत्राट देण्यात आले आहे. बेस्टच्या ताफ्यातील ४००० पैकी ८० टक्के बसगाडय़ांमधील कॅमेरे बंद पडले आहेत, तर बस कधी, कुठे पोहोचली याची माहिती मोबाइलवर मिळणाऱ्या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत, असा आरोप करीत सुहास सामंत यांनी वव्र्ह कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र आपणच योजना आणायच्या, प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केल्यावर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून मुंबईकरांची दिशाभूल करायची. शिवसेना प्रशासनावर वेगवेगळ्या मार्गानी दबाव टाकून कामे करवून घेत असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक शिवजी सिंह यांनी या वेळी केला. या मुद्दय़ांवरून उभयतांमध्ये शाब्दिक चकमकही घडली. अखेर बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला.
८० टक्के ‘बेस्ट’ बसमधील कॅमेरे बंद, आसने डळमळीत
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, बस कुठे आहे आणि ती थांब्यावर कधी येणार याची माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळावी यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन
First published on: 25-03-2015 at 08:04 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv and seats of best buses in bad condition