ठाणे शहरातील विद्युत खांबांवर वीज बचतीसाठी एलईडी दिवे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडल्याची माहिती बुधवारच्या सर्वसाधारण सभेत पुढे आली असून या प्रस्तावाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विद्युत खांबांवर या सुविधा असत्या तर स्वप्नाली लाड प्रकरणातील आरोपींना पकडता आले असते, असा दावाही या वेळी त्यांनी केला. दरम्यान, या प्रस्तावाबाबत संबंधित विभागाने येत्या दोन दिवसांत महापालिका आयुक्तांशी चर्चा करावी आणि या कामाची तातडीने निविदा काढावी, असे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे उशिराने का होईना पण नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी एक योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे येथील कापुरबावडी परिसरात रिक्षातून उडी मारल्याने स्वप्नाली लाड ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. रिक्षाचालक चुकीच्या मार्गाने रिक्षा नेत असल्यामुळे स्वप्नाली घाबरली आणि तिने बचावासाठी रिक्षातून उडी मारली होती. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून आले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातून नगरसेवक निधीतून शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी परवानगी देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, नगरसेवक निधीतून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची तरतूद नियमावलीत नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले. याच मुद्दय़ावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला टीकेचे लक्ष्य केले. दरम्यान, एक कंपनी मोफत एलईडी दिवे आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसवून देण्यास तयार असून त्या संबंधीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी विद्युत विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल आणि महापालिकेच्या खर्चावर अधिक बोजाही पडणार नाही. असे असतानाही या प्रस्तावाविषयी महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी महापालिका प्रशासनावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान, या प्रस्तावाबाबत संबंधित विभागाने येत्या दोन दिवसांत महापालिका आयुक्तांशी चर्चा करावी आणि या कामाची तातडीने निविदा काढावी, असे आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले आहेत.
प्रस्ताव
काय आहे?
विद्युत खांबांवर मोफत एलईडी दिवे आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. एलईडी दिव्यांमुळे ७० टक्के विजेच्या बिलात बचत होते. त्या ७० टक्क्यातील ५० टक्के रक्कम संबंधित कंपनी घेईल आणि वीज दिव्यांची देखभाल करेल. त्यामुळे या योजनेचा महापालिकेच्या खर्चावर बोजा पडणार नाही.

Story img Loader