डोंबिवलीतील टिळकनगर प्रभागात  नऊ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे स्थानिक नगरसेवकाने स्वनिधीतून बसवले आहेत. एका लहानग्या प्रभागात अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
मनसेचे नगरसेवक मनोज राजे यांच्या निधीतून सव्वा दोन लाख रुपये खर्च करून प्रभागातील मंजुनाथ शाळा गल्ली, साईबाबा मंदिर, टिळकनगर टपाल कार्यालय, गणपती मंदिर, गोपाळनगर गल्ली अशा नऊ ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.  कॅमेऱ्यांचे नियंत्रण दोन कक्षांतून केले जाणार आहे. चोरीची किंवा काही घटना घडल्यास या नियंत्रण कक्षातील चित्रमुद्रणावरून घटनेचा मागोवा घेणे पोलिसांना शक्य होईल, असे नगरसेवक मनोज राजे यांनी सांगितले.  सुरक्षित प्रभाग असावा म्हणून हा उपक्रम आपण राबविला असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणमध्ये दुर्दशा
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर एक छोटय़ाशा खोलीत नियंत्रण कक्ष आहे. तो बंद असतो. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण करण्यासाठी नियंत्रक भेटत नसल्याची पोलिसांची खंत आहे. चोरी किंवा अन्य काही घटना घडल्यास शोधाशोध करून पोलिसांना या कॅमेऱ्यांमधील फुटेज मिळवावे लागते.  अशी माहिती नगरसेविका शर्मिला वाळुंज यांनी दिली.  शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवला होता. या वेळी पोलिसांनी त्या कॅमेऱ्यांचे योग्य संचालन करून असे हमीपत्र दिल्याशिवाय त्यांना कॅमेरे बसवून देऊ नयेत, असा निर्णय महासभेने घेतला. डोंबिवलीत खासगी पातळीवर असलेले ४४  कॅमेऱ्यांमधील अनेक कॅमेरे बंद आहेत. त्यांचे नियंत्रण कोण व कोठे करतो याचा थांगपत्ता नाही, अशी खंत पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी डोंबिवलीत व्यक्त केली होती. या यंत्रणेवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader