तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ व उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटी शहरात सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर शहरात दुकानांसह चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा पोलिसांचा प्रस्ताव असून रहिवासी व व्यापाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
व्यापारी पेठ असल्याने शहरात कायम दुकानफोडीच्या घटना घडत असतात. अलीकडेच मुख्य व्यापारी वस्तीत एकाच रात्री सात दुकाने फोडण्यात आली. चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने व्यापारी व रहिवाशांमध्ये पोलिसांविषयी असंतोष वाढीस लागला आहे. त्यामुळेच पोलिसांनी रहिवाशांची विशेष बैठक बोलावून त्यांच्यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मांडला. भविष्यातील चोऱ्या रोखण्यासह इतर प्रकारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास यामुळे मदत होऊ शकेल, असा पोलिसांचा दावा आहे. प्रारंभी बैठकीत शहरातील वाढत्या चोऱ्या, बेशिस्त वाहतूक याविषयी चर्चा झाली. प्रास्ताविकात साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी सद्य:स्थिती व भविष्यातील परिस्थितीविषयी मत मांडले. घोटी शहराचा व्यापार पाहता प्रत्येक व्यापाऱ्याने आपापल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे फायद्याचे ठरू शकेल. व्यापारी व रहिवाशांनी आपल्या दुकानाबरोबरच चौकाचौकात तसेच वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा बसविणे अपेक्षित आहे. पोलिसांना सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले. दरम्यान, पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रात्रीची गस्त वाढवावी, दिवसाही वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी, अशा सूचना रहिवाशांनी केल्या.
दुकानदारांनी आपल्या दुकानात रात्रभर विजेचा बल्ब लावावा, तसेच उद्योजकांनी बाहेरच्या भागातही प्रकाशाची व्यवस्था करावी, वीज वितरण कंपनीनेही शहरातील प्रमुख मार्गावरील रखडलेले वीज यंत्रणेचे काम पूर्ण करावे, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. याबाबतचे नियोजन करण्यासाठी काही दिवसांतच पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या समन्वय बैठकीत डॉ. विकास देव, डॉ. युनूस रंगरेज, अमित लहाने, मिलिंद वालतुले, उपसरपंच रामदास शेलार, शरद हांडे आदींनी सूचना केल्या. व्यापारी, उद्योजक, बँका, पतसंस्था हॉटेलचालक आदींना सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Story img Loader