उरण तालुक्यातील जागतिक दर्जाच्या प्रकल्पांमुळे तसेच वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उरण परिसरात, शहराच्या सीमांवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याप्रमाणे विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू झाले आहे. उरण शहरातील प्रवेशद्वार, मुख्य रहदारीच्या ठिकाणी तसेच उरण तालुक्याच्या सीमांवरही सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. यात वाढ करून ही यंत्रणा अधिक सक्षम करून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली आहे.
ओ.एन.जी.सी. तेल शुद्धीकरण प्रकल्प, आशिया खंडातील सर्वात मोठे जेएनपीटी बंदर, देशातील पहिला वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस भरणा प्रकल्प असे अनेक प्रकल्प उरण तालुक्यात कार्यान्वित आहेत.  करंजा व मोरा ही दोन मोठी बंदरे या तालुक्याला लागून आहेत. या प्रकल्पांमुळे उरण तालुका संवेदनशील बनला आहे. त्यामुळे तालुक्यातील सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची झाली आहे. याकरिता उरण पोलिसांनी शहरात सीसीटीव्हीची यंत्रणा बसविलेली आहे.  शहराप्रमाणेच उरण पोलिसांनी तालुक्यांच्या मुख्य सीमांवरदेखील सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेण तालुक्याची सीमा असलेल्या दादर वशेणी खाडीपुलाजवळ तसेच बोकडविरा चार फाटा, उरण एस.टी. स्टॅण्ड चारफाटा येथे हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. उरण पोलीस ठाण्याच्या नियंत्रण कक्षातून उरण परिसरात होणाऱ्या गुन्ह्य़ांवर यामुळे नजर ठेवता येते. सध्या सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्हे उघड होण्यास मदत होत असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. उरण पोलिसांनी नगरपालिकेला सीसीटीव्हींच्या संख्येत वाढ करावी याकरिता पत्र दिले आहे. तसेच उरण परिसरातील प्रत्येक उद्योगाच्या परिसरातही सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे गलांडे यांनी या वेळी सांगितले. याकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन भाजपचे नगरसेवक महेश बालदी यांनी दिले आहे.

Story img Loader