ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये तब्बल १२०० सीसी टीव्ही बसविण्याचा र्सवकक्ष असा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला असून त्यासाठी सुमारे १७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढी मोठी रक्कम कोठून उभारायची असा प्रश्न सध्या महापालिकेस पडला असून त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाची रेल्वे स्थानके, तलाव परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले असून पोलीस आयुक्तांनी सुचविलेल्या ठिकाणांचा या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.
२६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रमुख शहरांच्या सुरक्षीततेसाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्याचा निर्णय सरकारदरबारी घेण्यात आला होता. मुंबईत अशा प्रकारचे तब्बल पाच हजार कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करणे अद्यापही राज्य सरकारला शक्य झालेले नाही. नवी मुंबई महापालिकेने मात्र शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला.
नवी मुंबई पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्तपणे शहरातील प्रमुख ठिकाणांची पडताळणी केली आणि कॅमेरेही बसविले. नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही कॅमेरे बसविले जावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मध्यंतरी ठाण्यातील एका कार्यक्रमात सीसी टीव्ही बसविण्यासाठी आमदारांनी आपला निधी सरकारकडे वर्ग करावा, असे आवाहन केले. त्यानुसार ठाणे शहरातील काही आमदारांनी निधी उपलब्ध करून दिल्याने रेल्वे स्थानक परिसरात सीसी टीव्हीचे जाळे विणण्यात आले आहे. हा प्रयोग संपूर्ण शहरात राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून ठाणे पोलिसांच्या मदतीने तब्बल एक हजारांहून अधिक ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे १२०० सीसी टीव्ही उभारण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तला दिली.