विद्यार्थ्यांची धोक्यात आलेली सुरक्षितता, वर्गातील चोऱ्यांचे वाढते प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मारामाऱ्या आणि इतर असभ्य वर्तन या समस्यांवर उतारा म्हणून वर्गावर्गात सीसीटीव्ही बसविण्याचा नामी उपाय मुंबईतल्या काही शाळांनी योजला आहे खरा, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत खरंच सकारात्मक फरक पडला आहे की, त्यावरही पळवाटा विद्यार्थ्यांनी शोधल्या आहेत, वर्गावर्गात बसवलेल्या सीसीटीव्हींमुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग एका दबावाखाली वावरत आहेत का, या व्यवस्थेचा वापर शिक्षकांविरोधात कारवाईचे हत्यार उपसण्यासाठी केला जातो का, असे अनेक यामुळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
यासंदर्भात शिक्षक, पालक संघटना आणि शाळा संचालकांशी बोलल्यानंतर एका बाबतीत त्यांचे एकमत आहे की, अपहरण तसेच इतर गैरकृत्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे प्रवेशद्वार वा व्हरांडय़ात सीसीटीव्ही बसवणे अत्यावश्यक बनले आहे. मात्र द्वाड विद्यार्थ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा ही खरोखरीच दीर्घकालीन उपाय ठरू शकते का, याबाबत मात्र पालक संघटना आणि शिक्षकांमध्येही नकारात्मक प्रतिक्रिया उमटलेली दिसते.
मुलांचे बालपण हे खरेतर शाळेतच खुलते. अशावेळी त्यांच्यावर सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांनी सतत नजर ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल पालक मंडळी विचारतात. तर व्रात्य मुलांवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्या वर्तनात शालेय पातळीवर सुधारणा करण्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे. काही शाळांनी वर्गात सीसीटीव्ही बसविलेले नाहीत तर काही शाळांनी फक्त आवारात आणि पॅसेजमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. सीसीटीव्ही बसविणे हा फक्त मुलांना धाक देण्यासाठीचा उपाय असल्याचे मतही काही मुख्याध्यापकांनी नोंदविले आहे. सीसीटीव्ही आपल्यावर नजर ठेवून आहे, असे समजल्यावर व्रात्य मुले आपण पकडले जाऊ या भीतीने शिस्तीत वागतील, असे या मुख्याध्यापकांना वाटते. मुलांमध्ये छोटय़ा चोरीच्या प्रकारांनाही आळा बसेल, असेही मत व्यक्त केले जात आहे. सीसीटीव्ही ही काळाची गरज असल्याचे मात्र सर्वच मुख्याध्यापकांना वाटत आहे.

आमच्या मते..
* ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या व्हरांडय़ांमध्ये सीसीटीव्ही प्रणालीचा उपयोग करणे आवश्यक असले तरी वर्गावर्गात लावलेल्या सीसीटीव्हींमुळे सहज, तणावमुक्त शिक्षणाची प्रक्रिया धोक्यात येऊ शकते. आपल्यावर कुणाची तरी नजर आहे, याची दहशत विद्यार्थ्यांच्या शिकण्याला आणि शिक्षकांच्या शिकवण्याला बाधा पोहोचू शकते. जर एखादा विद्यार्थी सहाध्यायीच्या वस्तू चोरताना पकडला गेला तरी ती गोष्ट शिक्षक अथवा संचालकांनी संयमाने हाताळायला हवी. अख्ख्या वर्गासमोर मानहानी करून त्याच्या आत्मसन्मानाला बाधा पोहोचवणे त्या विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मदत घेता येईल,’ असेही त्यांनी सुचवले. सीसीटीव्हीमुळे कामचुकार शिक्षकांवर देखरेख ठेवणे शक्य होईल, पण विद्यार्थी आणि शिक्षकांमधील परस्परसंवादाला खीळ बसेल
– अरुंधती चव्हाण,
अध्यक्ष, पॅरेन्टस् टीचर्स असोसिएशन युनायटेड फोरम

* शाळेच्या वर्गात वा शिक्षक कक्षात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या शाळांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. यासंबंधांत पालकांच्या आणि शिक्षकांच्या अनेक तक्रारी आहेत. आपल्या वावरावर कुणीतरी सतत लक्ष ठेवून आहे, या भावनेमुळे मुलांच्या नैसर्गिक बागडण्याला, मुला-मुलांमधील गमतींना वेसण बसते. सीसीटीव्ही फुटेज बघून कारवाई करण्याच्या धमक्या शिक्षक मुलांना देतात तर अप्रत्यक्षपणे शिक्षकांवर शाळा व्यवस्थापन लक्ष ठेवून असते. शिक्षक कक्षात सीसीटीव्ही बसवणे हा तर शिक्षकांच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे. शिस्तपालनाच्या नावाखाली वर्गांत सीसीटीव्ही बसवणाऱ्या शाळांनी इतर पद्धतींचा अवलंब करायला हवा. केवळ विद्यार्थी आणि शिक्षकांना कचाटय़ात पकडण्यासाठी सूडबुद्धीने सीसीटीव्ही व्यवस्थेचा अवलंब करणे हे शिक्षणप्रक्रियेला घातक ठरू शकेल. केवळ प्रवेशद्वार आणि शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवणे योग्य ठरेल.
– जयंत जैन,
अध्यक्ष ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’

* सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळा परिसरात घडणाऱ्या अनेक गैरकृत्यांना आळा घालणे शक्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, वाढत्या असुरक्षिततेच्या वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. इंडियन एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थेच्या ठिकठिकाणी अनेक शाळा असल्याने ठिकठिकाणच्या कामकाजाचा समन्वय साधण्यासाठी तसेच देखरेखीसाठी बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरते. या यंत्रणेमुळे ग्रंथालयात पुस्तकांच्या होणाऱ्या गैरवापराला आळा बसू शकतो. तसेच फारसे जिथे कुणी फिरकत नाही, अशा जागांवरही देखरेख ठेवता येते. शाळेच्या संपत्तीचे नुकसान होत नाही ना, हे पाहणे सीसीटीव्हीमुळे शक्य झाले आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळेचे विद्यार्थी तसेच बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या बाहेरच्या परीक्षार्थीवरही कॉपी न करण्यासाठी वचक राहतो. त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी सीसीटीव्ही तंत्राच्या वापराकडे सकारात्मक नजरेने पाहायला हवे,’
– अमोल ढमढेरे,
उपाध्यक्ष, इंडियन एज्युकेशन सोसायटी

* ‘एकीकडे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीच्या समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले असताना त्यावर सरसकट उपाय म्हणून सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेऊन दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करणे, म्हणजे शाळांनी अनुसरलेला शॉर्टकट आहे. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला जातोच, असे नाही. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या संपूर्ण प्रक्रियेकडे सतत लक्ष पुरवणे शाळांना अशक्यप्राय असते. अशा वेळी दांडगाई केली आणि तरीही कारवाई झाली नाही तर मात्र मुलांना उलट संदेश मिळतो आणि ते अधिक घातक ठरते,’
– मथिला दळवी,
संचालक, ‘संवाद अ डायलॉग

Story img Loader