विद्यार्थ्यांची धोक्यात आलेली सुरक्षितता, वर्गातील चोऱ्यांचे वाढते प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मारामाऱ्या आणि इतर असभ्य वर्तन या समस्यांवर उतारा म्हणून वर्गावर्गात सीसीटीव्ही बसविण्याचा नामी उपाय मुंबईतल्या काही शाळांनी योजला आहे खरा, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत खरंच सकारात्मक फरक पडला आहे की, त्यावरही पळवाटा विद्यार्थ्यांनी शोधल्या आहेत, वर्गावर्गात बसवलेल्या सीसीटीव्हींमुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग एका दबावाखाली वावरत आहेत का, या व्यवस्थेचा वापर शिक्षकांविरोधात कारवाईचे हत्यार उपसण्यासाठी केला जातो का, असे अनेक यामुळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
यासंदर्भात शिक्षक, पालक संघटना आणि शाळा संचालकांशी बोलल्यानंतर एका बाबतीत त्यांचे एकमत आहे की, अपहरण तसेच इतर गैरकृत्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे प्रवेशद्वार वा व्हरांडय़ात सीसीटीव्ही बसवणे अत्यावश्यक बनले आहे. मात्र द्वाड विद्यार्थ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा ही खरोखरीच दीर्घकालीन उपाय ठरू शकते का, याबाबत मात्र पालक संघटना आणि शिक्षकांमध्येही नकारात्मक प्रतिक्रिया उमटलेली दिसते.
मुलांचे बालपण हे खरेतर शाळेतच खुलते. अशावेळी त्यांच्यावर सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांनी सतत नजर ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल पालक मंडळी विचारतात. तर व्रात्य मुलांवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्या वर्तनात शालेय पातळीवर सुधारणा करण्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे. काही शाळांनी वर्गात सीसीटीव्ही बसविलेले नाहीत तर काही शाळांनी फक्त आवारात आणि पॅसेजमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. सीसीटीव्ही बसविणे हा फक्त मुलांना धाक देण्यासाठीचा उपाय असल्याचे मतही काही मुख्याध्यापकांनी नोंदविले आहे. सीसीटीव्ही आपल्यावर नजर ठेवून आहे, असे समजल्यावर व्रात्य मुले आपण पकडले जाऊ या भीतीने शिस्तीत वागतील, असे या मुख्याध्यापकांना वाटते. मुलांमध्ये छोटय़ा चोरीच्या प्रकारांनाही आळा बसेल, असेही मत व्यक्त केले जात आहे. सीसीटीव्ही ही काळाची गरज असल्याचे मात्र सर्वच मुख्याध्यापकांना वाटत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा