शहरात पोलीस विभाग आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा चांगला उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल. कुठेही गुन्हा घडल्यास या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना शोधणे पोलिसांना सोपे जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
जेसीआय व चंद्रपूर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शहरातील महत्त्वाच्या चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा येथे कंट्रोल रूम उभारण्यात आली असून या कंट्रोल रूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राजीव जैन, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, महापालिका आयुक्त प्रकाश बोखड, सीमा व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या प्रिती जैन, उपजिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश गुंडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ, वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, युवा उद्योजक आणि या योजनेत महत्त्वाचे योगदान देणारे मेघनाद जानी, जेसीआय अध्यक्ष शेखर लोहिया उपस्थित होते.
 चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डीग एक महिन्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कुठेही गुन्हा घडल्यास सहजपणे व्हीडीओ उपलब्ध होऊ शकेल. हा उपक्रम पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, महानगरपालिका व जेसीआय यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला आहे. याचप्रकारे लोकसहभागतून पुढेही चांगले उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ३ जानेवारीपासून पोलीस विभागातर्फे मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम जिल्हय़ात राबविण्यात येत आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात केंद्र शासनाच्या मदतीने मतिमंद मुलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. म्हैसेकर म्हणाले. लोकसहभागातून शहरात एक चांगला उपक्रम राबविण्यात आल्याने सर्वाच्या मनात समाधानाची भावना आहे. आम्ही या उपक्रमाचा केवळ पोलीस विभागाच्या दृष्टीकोनातून विचार केला असला, तरी भविष्यात याचे अनेक उपयोग होणार आहे. जनतेने मनात घेतले तर काहीही होऊ शकते, हे या उपक्रमाने दाखवून दिले आहे, असे राजीव जैन म्हणाले. मेघनाद जानी यांची ही मूळ कल्पना असून त्यांना सहकार्य करण्याचे काम आपण केले. केवळ २० दिवसात १२ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा हा उपक्रम पूर्ण केला. यापुढे चंद्रपूर शहरातील दोन चौकांसह बल्लारपूर, वरोरा, भद्रावती येथेही हा उपक्रम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. मेघनाद जानी म्हणाले, माझ्य़ा मनात एक वर्षांपूर्वी चंद्रपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची कल्पना आली होती. याबद्दल आपण पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना सांगितले. त्यांनी ही बाब गंभीरतेने घेऊन शहरातील व्यापारी बांधवांची सभा घेतली. या उपक्रमास व्यापारी बांधवांचे चांगले सहकार्य लाभले. तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनीही या उपक्रमासाठी चांगली मेहनत घेतली. याप्रसंगी हा उपक्रम राबविण्यास सहकार्य करणाऱ्या सर्वाना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा