पुण्यात सीसीटीव्ही उपकरणांचा खप गेल्या एका वर्षांत सुमारे ३५ टक्क्य़ांची वाढला आहे. दररोज पुण्यातील सीसीटीव्ही विक्रेत्यांकडे पाचशे ते हजार ग्राहक या उपकरणांसाठी विचारणा करतात. इतकेच नव्हे तर आता केवळ दुकानदार आणि व्यापाऱ्यांबरोबरच घरगुती वापरासाठी सीसीटीव्ही घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढली आहे.
‘काँप्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष जयंत शेटे यांनी ही माहिती दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील काँप्युटर व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे ३२० विक्रेते या संस्थेचे सदस्य आहेत.
पुण्यातील साखळी बाँबस्फोट, फसवणूक व साखळी चोरीच्या घटना आणि एकूणच वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून काही प्रमाणात दिलासा मिळविण्याकडे नागरिकांचा कल आहे. विशेष म्हणजे नोकरीनिमित्त बराच वेळ बाहेर रहावे लागणारे नागरिक घरात एकटय़ा राहणाऱ्या लहान मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून घेत आहेत. दुकाने किंवा सोसायटय़ांमध्ये सुरक्षाररक्षक नेमलेले असले तरी त्यांच्याकडून होऊ शकणारी मानवी चूक टाळण्यासाठी सीसीटीव्हीला पसंती दिली जात आहे. या उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांच्या किमतीत घट झाली आहे. प्राथमिक स्वरूपाचा सीसीटीव्ही कॅमेरा दोन हजार रुपयांपासून तर अंधारात चित्रीकरण करू शकणारा कॅमेरा अडीच हजारांपासून उपलब्ध आहे. चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि या कॅमेऱ्यांचे आऊटपुट टीव्हीवर दाखविणारे ‘डीव्हीआर’ उपकरण असा संच वीस हजार रुपयांपासून मिळत असून ग्राहकांचा त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे शेटे यांनी सांगितले.
आता सीसीटीव्ही कॅमेरे टिपत असलेली दृस्ये टू-जी आणि थ्रीजी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या साहाय्याने थेट मोबाईलवर बघण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पालकांना आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी घरगुती तत्त्वावर हा मार्ग वापरणे सोपे असल्यामुळे अशा प्रकारच्या ‘लाईव्ह व्ह्य़ू’ सीसीटीव्ही कॅमेऱ्याला व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांकडूनही वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते अमित ओसवाल यांनी सांगितले. दिवसा आणि रात्रीही वीस मीटर अंतरापर्यंतची दृष्ये टिपणाऱ्या ‘ऑल इन वन वायफाय कॅमेऱ्या’ला तसेच तब्बल दोनशे मीटर पर्यंत टेहळणी करू शकणाऱ्या हालत्या ‘पीटीझेड’ कॅमेऱ्यांनाही ग्राहक पसंती देत असल्याची माहिती विक्रेते संतोष राजणे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा