वाहतुकीचे नियम पाळण्यात मुंबईकर अग्रेसर असले, तरीही एखाद वेळी लाल सिग्नल पाहूनही गाडी दामटवणाऱ्यांच्या स्वागतासाठी वाहतूक पोलीस नाक्यानाक्यांवर हजर असतात. अशा नियम मोडणाऱ्यांना पावती फाडून दंड करण्यात येतो. मात्र कधी कधी अधिकृत दंडाऐवजी अनधिकृत ‘चिरीमिरी’ स्वीकारून नियम मोडणाऱ्यांना सोडून देण्यात येते. आता हे प्रकार टाळण्यासाठी येत्या दोन महिन्यांत ई-चालान सुविधा अमलात येणार आहे. या सुविधेबरोबरच चौकाचौकांतील वाहतूक पोलिसांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजरही असेल. त्यामुळे ही ‘चिरीमिरी’ प्रथा कायम बंद होणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. तसेच अपघातग्रस्त वाहनांचे ऑडिट करण्यासाठी ‘क्रॅश अ‍ॅनालिसिस कंट्रोल रूम’ उभारण्यात येण्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्या मुंबईत हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सिग्नल न पाळणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, परवाना नसताना गाडी चालवणे आदी विविध गुन्हे घडत असतात. अनेकदा या गुन्हय़ांत पकडलेल्या लोकांना रीतसर पावती फाडून दंड भरावा लागतो. मात्र बऱ्याचदा वाहतूक पोलिसांच्या हातावर थोडी ‘चिरीमिरी’ टेकवून सुटका करण्याची मानसिकता दाखवली जाते. याला आळा घालण्यासाठी आता पकडलेल्या चालकाकडून क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारेच दंड वसूल करण्यासाठी ‘ई-चालान’ सुविधा अमलात येणार आहे. या सुविधेत वाहतूक पोलिसांच्या हाती एक मशीन दिले जाईल. त्या मशीनद्वारे आकारलेल्या दंडाची रक्कम चालकाच्या खात्यातून थेट वाहतूक शाखेकडे जमा होईल. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास भारंबे यांनी व्यक्त केला.
मुंबईकरांचा बराच वेळ वाहतूक कोंडी जात असून त्यावर उपाय म्हणून ‘मुंबई ट्रॅफिक अ‍ॅप’ या मोबाइल अ‍ॅपचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. हे अ‍ॅप दहा दिवसांत मुंबईकरांच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. मुंबईत कोणकोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे, कोणत्या ठिकाणी पार्किंगसाठी किती जागा शिल्लक आहे, वाहतुकीचे नियम, नियम मोडल्यास दंडाची रक्कम आदी सर्व माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध असेल. मुंबईतील सर्व रस्त्यांवरील वाहतुकीची माहिती एका क्लिकद्वारे मुंबईकरांच्या हाती पडणार आहे.
एखादा अपघात झाल्यावर तो कसा झाला, कोणाच्या चुकीमुळे झाला, वाहनात काही दोष होता का, वेग किती होता, रस्ता खराब असल्याने अपघात झाला का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी क्रॅश अ‍ॅनालिसिस कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. या नियंत्रण कक्षामुळे अपघाताचे मुख्य कारण समजण्यास मदत होईल. तसेच आता परिवहन विभागानंतर वाहतूक पोलीसही वाहनांचे ऑडिट करणार आहेत.

Story img Loader