‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. धुळवड खेळण्याच्या धुंदीत पुढचा-मागचा विचार न करता घातक रासायनिक रंगांनी सर्रास खेळले जाते. पण सावधान, या घातक रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहायला मिळत असून धुळवड खेळायचीच असेल तर ती नैसर्गिक रंगाने खेळली जावी, असा विचार हळूहळू जोर धरू लागला आहे. धुळवड हा रंगांचा उत्सव असला तरी त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक रंगांमुळे त्वचेचे विकार, घसा, डोळे यांना होणारी गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे आता रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंग वापरण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ आणि डॉक्टर मंडळींचेही तेच मत आहे.
घातक रासायनिक रंगांमुळे गंभीर इजा
पाण्याने/रंगाने भरलेले फुगे, प्लास्टिकच्या छोटय़ा पिशव्या फेकून मारणे हा अनेकांचा असतो. पण त्यामुळे अनेकांना शारीरिक जखमेबरोबरच मानसिक धक्काही बसतो. आणि म्हणूनच रंगाचा बेरंग होणार नाही, त्याची काळजी घेऊन धुळवड साजरी करावी, असे आवाहन घरातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तयार करण्याचा प्रचार करणाऱ्या आणि त्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेणाऱ्या पर्यावरणप्रेमी अनघा जोशी-सहस्त्रबुद्धे यांनी केले.
असे तयार करा नैसर्गिक रंग
हाताला लावायच्या मेंदीची पाने, हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, पुदिना आदीपासून हिरवा रंग खूप मोठय़ा प्रमाणात मिळू शकतो. पिवळ्या रंगासाठी हळद हा शुद्ध आणि खात्रीचा पर्याय आहे. जास्वंदीच्या फुलांपासून लाल रंग तयार करता येतो. मुलतानी माती, काळी/लाल माती यापासूनही आपण रंग तयार करू शकतो. पांगारा, बीट हे सुद्धा नैसर्गिक रंग आपल्याला देतात. रक्तचंदनाचे खोड उगाळून लाल रंग मिळू शकतो, असेही त्या म्हणाल्या.     
घातक रासायनिक रंग
धुळवडीच्या रंगांमध्ये प्रामुख्याने शिसे, पोटॅशियम डायक्रोमेट, बोरिक पावडर, कास्टिक सोडा, ब्लिचिंग पावडर, िझक ऑक्साईड, ऑक्झालिक अ‍ॅसिड तसेच अन्य रसायने वापरली जातात. ही सर्व रसायने शरीरासाठी अत्यंत घातक असतात. ही रसायने कळत-नकळत जरी डोळ्यात, तोंडात, कानात गेली तरी अपाय होतो. कधी तर जीवावरही बेतू शकते. डोळा निकामी होणे, त्वचेला इजा पोहोचणे त्यामुळे घडू शकते.
हे टाळा
शिसे, पोटॅशियम डायक्रोमेट, बोरिक पावडर, कास्टिक सोडा, ब्लिचिंग पावडर, िझक ऑक्साईड, ऑक्झालिक अ‍ॅसिड यापासून तयार केलेले रासायनिक रंग
यांचा वापर करा
पिवळा रंग-हळद
लाल रंग- जास्वंदीची फुले/रक्तचंदनाचे खोड/बीट
काळा/तपकिरी मातकट रंग-  माती
हिरवा रंग- कोणत्याही हिरव्या पालेभाज्यांची पाने, कोथिंबीर, पुदिना, हाताला लावायच्या मेंदीची पाने