राष्ट्रवादीचे नागपूरकरांना आवाहन
महाराष्ट्राच्या काही भागात पडलेल्या अभूतपूर्व दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या धुळवडीत सर्वानीच पाण्याचा अपव्यय टाळावा आणि शक्यतो गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देत कोरडी धूळवड साजरी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल लोंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. दुष्काळाच्या झळा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भातील बुलढाणा, वाशीम या जिल्ह्य़ांसह अन्य जिल्ह्य़ांनाही दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात दुष्काळी भागांसाठी २ हजार ८६ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
दुष्काळी भागातील जनतेला ५० किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे, पाऊस न पडल्याने लाखो एकर शेती उजाड झाली आहे. भूजलाचा साठाही खोल गेला आहे. नागपूर जिल्हा आणि शहराच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. जंगलांमधील पाणीसाठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळू लागले आहेत, अशा अभूतपूर्व परिस्थितीचे भान ठेवून तसेच श्रद्धा आणि परंपरांचा पूर्ण आदर राखून नागरिकांनी यंदाच्या धुळवडीत पाण्याची नासाडी शक्यतो टाळावी, असे लोंढे यांनी म्हटले आहे.  
शहरातील काही भागांना २४ बाय ७ पाणी पुरवठा केला जाण्यासाठी नागपूर महापालिकेने योजना आखली असली तरी नागरिकांनी संयमाने पाणी वापरण्याची गरज आहे. आपल्याला पाणी मिळाले म्हणून वाट्टेल तसे पाणी वापरा ही प्रवृत्ती टाळली जावी. नागपूर शहराला पेंच, कन्हान आणि गोरेवाडा तलावातून पाणी पुरवठा केला जात असला तरी मे महिन्याच्या अखेपर्यंत तो पुरवावा लागणार आहे. ‘ग्लोबल वार्मिग’ची झळ संपूर्ण जगाला बसत असून त्याचा परिणाम पावसाच्या अनिश्चिततेवर झाला आहे.
 विदर्भात मान्सून वेळेवर येत नाही. मार्चच्या प्रारंभीच जलसाठय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने जलसंकटाची चाहूल लागली आहे. लघु प्रकल्पांमधून शहरे आणि खेडय़ांची तहान भागवली जाते. या प्रकल्पांमध्ये आता अपुरा साठा असल्याने पाणी कपातीचे संकट ओढवले आहे, याचा लोंढे यांनी उल्लेख केला आहे.  पुढील तीन महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लक नसल्यामुळे मे महिन्यापासून जूनच्या पंधरवडय़ापर्यंत पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. नागपूर जिल्ह्य़ात पाच मोठे प्रकल्प, १३ मध्यम प्रकल्प व ६१ लघु प्रकल्प असून मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्के जलसाठा तर मोठय़ा प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्के साठा राहिला आहे. वाढत्या तापमानामुळे जलसाठय़ात वेगात घट होणार आहे. जिल्ह्य़ातील तोतलाडोह प्रकल्पात ४९ टक्के, रामटेक २७, नांद वणा २ आणि वडगाव ४० तर गोरेवाडय़ात ८० टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानामुळे जलसाठय़ाचे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होणार असल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे, याची जाणीव ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याने ‘पाणी वाचवा’ असे आवाहन लोंढे यांनी केले आहे.
धरणांमधील पाणी झपाटय़ाने कमी होत असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी काटकसर करावी लागणार आहे. धुळवडीच्या निमित्ताने दरवर्षी हजारो लीटर पाणी निष्कारण वाया घालविले जाते.  नागपूरची होळी परंपरा अतिशय उच्च आहे. संतपरंपरेचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापू यांच्या होलिकोत्सावात नुकतीच लाखो लीटर पाण्याची नासाडी करण्यात आली. असे प्रकार धूळवडीदरम्यान टाळावे, शक्यतो पर्यावरणपूरक वनस्पतींचे रंग कमीत कमी पाण्यात वापरावे किंवा गुलाल लावून शुभेच्छा द्याव्या, असे  आवाहन लोंढे यांनी केले आहे.