दोन दिवसांचे उपोषण, पालकमंत्र्यांबरोबर दोन वेळा बैठका व मनपाच्या सर्वसाधारण सभेत चर्चा असे सगळे काही होऊनही अद्याप कागदावरच असलेल्या नेहरू मंडईमुळे वैतागलेल्या नेहरू मंडई कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नेहरू मंडईच्या प्रतिकृतीचीच गुढी उभारून मनपाचा अभिनव निषेध केला.
कृती समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत लोढा, कार्याध्यक्ष संजय झिंजे तसेच काँग्रेसचे उबेद शेख यांच्यासह चितळे रस्ता हातगाडी, भाजी विक्रेते संघटनेचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. लोढा यांनी सांगितले की मनपाचे पदाधिकारी या मंडईबाबत सातत्याने नगरकरांची दिशाभूल करत आहेत. कृती समितीचे उपोषण आश्वासन देत मागे घ्यायला लावले व आता त्यावर कोणताही कार्यवाही व्हायला तयार नाही. निदान आजच्या शुभदिनी तरी त्यांना जाग यावी यासाठी ही प्रतिकृतीची गुढी ऊभारण्यात आली आहे.
 

Story img Loader