दीपावलीची धांदल सुरू असतानाच अज्ञात चोरटय़ांनी कराड शहरासह तालुक्यातील वेगवेगळय़ा ठिकाणी घरफोडय़ा, चोऱ्या करून सुमारे ४५ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून दिवाळी साजरी केली आहे. या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर सराईत चोरटय़ांच्या कारनाम्यांना पायबंद घालण्याचे आव्हानच उभे ठाकले आहे.
ऐन दिवाळीत एकाच दिवसात चोरटय़ांनी शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे सत्र यशस्वी राबविले. कोळे येथील आनंदा देवबा पाटील यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून अज्ञात चोरटय़ाने घरात प्रवेश केला होता. त्याने घरातील अन्य एक चावी शोधून काढून दुसऱ्या खोलीचे कुलूप उघडून त्यामधील कपाटातून तब्बल ३१ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत घडल्याची फिर्याद आनंदा पाटील यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे. फौजदार संतोष घोडके तपास करत आहेत. दिवाळी सण असला तरीही मॉर्निग वॉकला शहरातील नागरिक घराबाहेर पडतात, याची संधी साधून शहरातील पाटण कॉलनीतील तोलचंद भंडारी यांच्या घरात चोरटय़ाने हात साफ करून रोख रकमेसह दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
सकाळी साडेसहाच्या सुमारास भंडारी हे पत्नीसह मॉर्निग वॉकला गेल्यानंतर चोरटय़ांनी हा डाव साधला. भंडारी यांनी घराचा दरवाजा नुसताच ओढून घेतला होता, त्यामुळे चोरटय़ाने घरात घुसून कपाटातील दोन पाटल्या, एक चेन, पाच लेडीज अंगठय़ा असे दहा तोळे सोने व पँटच्या खिशातील ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत भंडारी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, उपनिरीक्षक अविनाश वनवे तपास करत आहेत. अन्य एका घटनेत सैदापूर येथील कृष्णा-गोविंदनगरमध्ये साहिब शब्बीर पटेल यांच्या राहत्या घरात सोमवारी (दि. ४) रात्री अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी करून घरातील दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट, प्रत्येकी एक तोळय़ाच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा, तीन ग्रॅमची सोन्याची कर्णफुले व सहाशे रुपयांच्या रोख रकमेसह सव्वाचार तोळय़ाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत पटेल यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

Story img Loader