कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मिळविलेल्या यशाबद्दल कोल्हापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर-पेढे वाटले. फटाक्याची आतषबाजी व वाद्यांच्या निनादाद विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.    
शेजारच्या कर्नाटक राज्यातील निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्य़ातील नागरिकांचे लक्ष वेधले होते. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत बाजी कोण मारणार याचे वेध लागले होते. सकाळपासूनच कार्यकर्त्यांंनी वृत्तवाहिन्यांकडे डोळे लावले होते. सुरुवातीपासूनच निकालाचा कौल काँग्रेस पक्षाकडे झुकू लागला तसतसे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.     
कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने निर्विवाद यश मिळविल्याचे जाहीर झाल्यावर काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा काँग्रेस भवनामध्ये एकत्र आले. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताश्यांच्या निनानाद कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन नागरिकांना साखर-पेढे वाटले. यामध्ये शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक सचिन चव्हाण, युवक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अजित राजीगरे, शिवप्रसाद घोडके, भारत घोडके, रवींद्र मोरे, किशोर खानविलकर, संपत चव्हाण, बाबुराव कांबळे, महंमद शेख आदींचा सहभाग होता.    
इचलकरंजी शहर काँग्रेस भवनसमोरही कार्यकर्त्यांनी या यशाचा जल्लोश साजरा केला. काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा जयघोष करण्यात आला. नागरिकांना साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला गेला. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, प्रकाशराव सातपुते, विलास गाताडे, अहमद मुजावर, लक्ष्मण पोवार, तौफीक मुजावर, शेखर शहा, रवींद्र जावळे, आनंदराव नेमिष्टे, संजय कांबळे, शशांक बावचकर, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, शंकुतला जाधव, जुगनू पिरजादा, रमेश पाटील, कोंडीबा दवडते, अनिल शिकलगार यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा