गुजरातमध्ये सलग तिसऱ्या वेळी मिळालेल्या विजयाचे भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेने पक्ष कार्यालयासमोर ढोल-ताशे वाजवून व पेढे वाटत स्वागत केले. पक्षातील गटबाजी नेहमीप्रमाणेच या कार्यक्रमातही दिसून आली. एका गटाने पक्ष कार्यालयासमोर, तर दुसऱ्याने जुन्या बसस्थानक चौकात विजय साजरा केला. दोन्ही ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा जयघोष करण्यात आला.
विकास करणाऱ्या भाजपच्या मागे गुजरातची जनता ठामपणे उभी आहे हे यातून दिसले, आता देशात सर्वत्र असेच चित्र दिसणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी पक्ष कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला. पक्षाचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी पक्षाच्या गुजरातमधील या विजयाबद्दल पक्ष कार्यालयाला एलसीडी टीव्ही संच भेट दिला. सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर, प्रविण ढोणे, विनोद बोथरा, योगेश मुथा, नरेश चव्हाण, बाळासाहेब पोटघन, पंकज जहागीरदार आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार दिलीप गांधी गटाच्या वतीने सुवेंद्र गांधी यांनी जुन्या बसस्थानक चौकात ढोलताशे वाजवत, फटाके फोडून या विजयाचे स्वागत केले. अनिल गट्टाणी, नगरसेवक नितिन शेलार, बंटी ढापसे, राम वडागळे, पियूष जग्गी, रोशन गांधी, भरत दळवी, पंकज खंडेलवाल, तसेच युवा मार्चाचे कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.    
सिद्धांताचा विजय
गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचा विजय हा पक्षाच्या सिद्धांताचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली. जनसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचा पक्षाचा विचार आहे. काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचाराचा तिटकारा भारतीय जनतेला आला आहे, हेच या विजयातून दिसते, असे गांधी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा