ओसंडून वाहणारी हॉटेल्स-बार.., मध्यरात्रीनंतरही दिवसाप्रमाणे गजबजलेले रस्ते..जनसागराची भरती आलेले गेट वे ऑफ इंडिया आणि चौपाटय़ा हे दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्रीचे मुंबईचे चित्र. पण यंदा सोमवारी आलेली ३१ डिसेंबरची रात्र नेहमीपेक्षा थोडी सुनी सुनी होती. वर्षांअखेरीस पर्यटनासाठी मोठय़ा प्रमाणात शहराबाहेर गेलेले मुंबईकर, दिल्लीतील बलात्कारपीडित तरुणीच्या मृत्यूचे सावट आणि मंगळवारी अंगारकी चतुर्थी आल्याने मुंबईत नवीन वर्षांचा जल्लोष झाला पण बेता बेताने.
दरवर्षी ३१ डिसेंबरची रात्र म्हणजे मुंबईभर मोठा जल्लोष असतो. गेट वे ऑफ इंडिया, चौपाटीवर रात्री पाय ठेवायला जागा नसते इतकी प्रचंड गर्दी उसळते. गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलिसांची तारांबळ उडते. पण यंदा गेट वे ऑफ इंडियावर निम्म्यापेक्षाही कमी गर्दी होती. चौपाटय़ांवर गर्दी उसळली, पण त्यात बहुतांश कुटुंबासह आले होते. मित्रांसह जाण्याऐवजी कुटुंबासह आनंद साजरा करण्यास अनेकांनी पसंती दिली. पावभाजी-रगडा पॅटीस सारख्या गरमागरम खमंग पदार्थाचा आस्वाद घेत, मस्त थंडगार फालुदा खात, मुलांसह फुगे उडवत अनेक कुटुंबांनी चौपाटय़ांवर जल्लोष केला. ‘गेट वे’ आणि चौपाटय़ांवर मोठी गर्दी उसळते हे लक्षात
यंदा तरुण-तरुणींची गर्दी लक्षणीय प्रमाणात कमी होती. दिल्लीतील प्रसंगामुळे अनेकांनी जल्लोषाला आवर घातला तर अनेक पालकांनीही ३१ डिसेंबरच्या झिंगलेल्या रात्री मित्रांसह जाण्यास मुलींना परवानगी नाकारली. शिवाय अनेक मुंबईकरांनी पर्यटनासाठी शहराबाहेर जाण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे मुळातच नाताळनंतरच्या दिवसापासून गाडय़ा, बस, रस्त्यांवरील गर्दी कमी दिसत होती. तेच चित्र सोमवारी रात्रीही कायम राहिले.
काठोकाठ भरलेल्या आणि फेसाळत्या चषकांमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्रीपासून एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत मनसोक्त डुंबणाऱ्यांचाही थोडा हिरमोड झाला. मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थी आली. त्यामुळे अनेकांनी बेत रद्द केला तर अनेकांनी एखाद-दुसऱ्या पेगनंतर आवरते घेतले. नवीन वर्षांची सुरुवात बाप्पाचे दर्शन घेऊन करण्यासाठी मंदिराची वाट धरली.
९५ वर्षांनंतर आलेला योग!
१ जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी येण्याचा योग यंदा तब्बल ९५ वर्षांनंतर आला. या योगाने अनेकांच्या ‘पार्टी’च्या मनसुब्यांवर अक्षरश: ‘पाणी’ पडले. वास्तविक हिंदू पंचागानुसार नवीन तिथी ब्राह्म मुहूर्तावर (पहाटे ४ च्या सुमारास) सुरू होते. परंतु इंग्रजी तारीख रात्री १२ वाजता बदलते. त्याच वेळी दिवसही बदलतो, असे समजून बहुतांश मंडळींनी अंगारकी मध्यरात्रीच सुरू झाली असा समज करून घेतला. परिणामी त्यांना आपली ‘मजा’ही आवरती घ्यावी लागली.
जल्लोष बेता-बेतानेच..
ओसंडून वाहणारी हॉटेल्स-बार.., मध्यरात्रीनंतरही दिवसाप्रमाणे गजबजलेले रस्ते..जनसागराची भरती आलेले गेट वे ऑफ इंडिया आणि चौपाटय़ा हे दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्रीचे मुंबईचे चित्र. पण यंदा सोमवारी आलेली ३१ डिसेंबरची रात्र नेहमीपेक्षा थोडी सुनी सुनी होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-01-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebration in small level