चौकाचौकात लावलेली तोरणे, संस्कार भारती महानगरतर्फे रामायणातील विषयांवर काढलेल्या सुंदर रांगोळ्या, पांढरे, भगवे, निळे, हिरवे फेटे घातलेली भाविक मंडळी आणि रामनामाचा गजर करणारी गीते अशा मंगलमय वातावरणात पश्चिम नागपूर नागरिक संघाच्यावतीने रामनगरातील राममंदिरातून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अभूतपूर्व शोभायात्रेला प्रारंभ झाला.
निवडणूकीमुळे एकीकडे वातावरण तापले असतानाच सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपल्यामुळे याचा फायदा घेत लोकसभा उमेदवारांनी त्यांची पावले मंदिराकडे वळवली. लोकसभेचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीतच सायंकाळी ५ वाजता रामंदिरात प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तत्पूर्वी दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्मसोहोळा पार पडला. सायंकाळी पालखी पूजनानंतर सहा वाजताच्या सुमारास राममंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली.
बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभवन चौक, कॉफी हाऊस चौक, झंडा चौक, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, श्रद्धानंदपेठ चौक, अभ्यंकरनगर, व्हीआरसीई कॉलेज, एलएडी कॉलेज, कार्पोरेशन स्कूल, हिल रोड, बाजीप्रभू चौकातून श्रीराम मंदिरात शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गावर विद्युत रोषणाई, सुंदर महाद्वारे उभारण्यात आली आहेत. शोभायात्रेत लक्ष्मीभवन चौकात शेवाळकर डेव्हलपर्स प्रा.लि. यांच्यातर्फे फटाका शो आयोजित करण्यात आला. तर लक्ष्मीनगर, श्रद्धानंदपेठ येथेही अभिजीत मुजूमदार यांच्यातर्फे फटाका शो करण्यात आला. विशेष म्हणजे शोभायात्रेचे थेट धावते समालोचन करण्यात आले.
आदर्श नवयुवक बहुउद्देशीय सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे सादर करण्यात आलेले आदिवासी नृत्य सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. तर बच्चेकंपनीसाठी टिव्हीतील कार्टून पात्रे प्रत्यक्षात प्रकट झाल्याने ते सुद्धा आनंदी झाले. शंकरनगर चौकात श्री आजनेय डेव्हलपर्स अँड बिल्डर्सतर्फे प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने असंख्य फुग्यांची मालिका आकाशात सोडण्यात आली. यावेळच्या शोभायात्रेचे विशेष म्हणजे विविध प्रसंगांवर आधारित दृश्ये रथांमध्ये साकारण्यात आली. विविध आकर्षक ५१ रामरथ विनोद सुर्यवंशी, मनोज बिंड, राजेश हजारे, मधुकर कावळे, विजय भामकर, ज्ञानेश्वर खापरे, विजय दारलिंगे यांनी तयार केले होते. हे रथ बघण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. विशेष म्हणजे भाविकांसाठी ठिकठिकाणी खानपानाची व्यवस्था करण्यात आली.

Story img Loader