होळी आणि धुळवड म्हणजे राग-लोभ विसरून सगळ्यांनी एकत्र जमून रंगीबेरंगी पाण्याने चिंब भिजून जायचा सण. परंतु, यंदाच्या  दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळून सिनेमाच्या सेटवर फक्त रंगांची उधळण करून होळी साजरी करण्याचे अनेक कलावंतांनी ठरविले आहे.
संशयकल्लोळ या आगामी मराठी चित्रपटातील सर्व कलावंतांनी तर अनेक ठिकाणी फिरून लोकांना ‘पाण्याचा अपव्यय टाळून फक्त रंगांची होळी खेळूया’ असे आवाहन केले. या चित्रपटाच्या सर्व कलावंतांनी ‘पाणी वाचवा, अनेकांचा घसा कोरडा पडलाय पाण्यासाठी’ असे लिहिलेले टीशर्ट परिधान करूनच लोकांना पाण्याविना धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले.
राज्यातील काही भागांतील लोकांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य भेडसावत आहे. आपल्या भागात मुबलक पाणी मिळतेय म्हणून पाण्याचा अतिवापर करून होळी आणि धुळवड साजरी करणे खचितच योग्य नव्हे. म्हणूनच यंदाची रंगपंचमी निळ्या-हिरव्या, पिवळ्या अशा फक्त रंगांची उधळण करून साजरी करायला हवी, असे मत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केले. संशयकल्लोळ चित्रपटातील विजय जोशी, अंकुश चौधरी, दिग्दर्शक विशाल इनामदार, पुष्कर श्रोत्री, गौरी निगुडकर, मृण्मयी देशपांडे आदींनी पाण्याचे अपव्यय टाळून धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले.
तर दुनियादारी या आगामी चित्रपटाच्या सेटवर सुशांत शेलार, स्वप्नील जोशी, रिचा परियाली, जीतेंद्र जोशी, उर्मिला कानेटकर, दिग्दर्शक संजय जाधव, निर्माता नानू जयसिंघानी, नागेश भोसले आदी कलावंतांनीही ‘रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे’ म्हणत रंगांची बरसात एकमेकांवर केली आणि बिनपाण्याची धुळवड साजरी केली. अंकुश चौधरी म्हणाला की, मराठवाडय़ासह आपल्या राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असून पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना बरीच वणवण करावी लागत आहे. असे असताना पाण्याचा वापर न करता धुळवड साजरी करणे, कमीत कमी पाणी वापरणे ही यंदा गरजेची आहे. ‘प्रेमाचा झोलझाल’ या सिनेमाचे चित्रीकरण महड येथे सुरू असून तेथेही विजय पाटकर, नवीन प्रभाकर, सिद्धार्थ जाधव, स्मिता गोंदकर, यांच्यासह दिग्दर्शक मनोज कोटीयन, लेखक हेमंत एदलाबादकर यांनी बिनपण्याची होळी साजरी केली.

Story img Loader