विद्यार्थी-प्राचार्याकडून विरोध
मोबाईलच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरात जॅमर बसविण्याच्या कल्पनेला विद्यार्थी आणि प्राचार्याकडून ‘खुळचट’ म्हणून विरोध होतोच आहे; पण, सेलफोन जॅमरचा सर्वाधिक फटका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेला बसणार आहे. कारण, गेली दोन वर्षे विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सेलफोन सेवेचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे.
विद्यार्थ्यांकडून सेलफोनचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी महाविद्यालय परिसरात सेलफोन जॅमर किंवा डिकोडर लावणे सक्तीचे करता येईल का, या संदर्भात ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग’ राज्यभरातील महाविद्यालये व शिक्षणसंस्थांकडून सूचना मागवित आहे. त्याकरिता सर्व विद्यापीठांनी उच्चशिक्षण संचालकांच्या सूचनेनुसार महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. मात्र, सेलफोन ‘जॅम’ करण्याच्या कल्पनेला विद्यार्थी संघटनांबरोबरच प्राचार्याकडूनही विरोध होतो आहे. कारण, सेलफोन जॅम केले तर विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयाच्या परिसरात येणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अभ्यागतांचाही बाहेरच्या जगाशी संपर्क संपून जाईल. स्वाभाविकच या कल्पनेचा महाविद्यालयीन व्यवस्थेशी संबंधित सर्वाकडूनच निषेध होतो आहे.
सेलफोन बंदीचा विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेलाच मोठा फटका बसेल, अशी प्रतिक्रिया ‘असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेज’चे अध्यक्ष आणि हिंदुजा महाविद्यालयाचे प्राचार्य टी. ए. शिवारे यांनी व्यक्त केली. ‘प्रश्नपत्रिकेचा सांकेतिक क्रमांक किंवा इतर महत्त्वाच्या सूचना विद्यापीठाच्या कलिना येथील परीक्षा विभागाच्या मुख्यालयातून महाविद्यालयांना एसएमएसच्या माध्यमातून रवाना होत असतात. जॅमरमुळे परीक्षा काळात एसएमएस सेवेचा वापर करण्यावर मर्यादा येतील,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच महाविद्यालयात येणारे विद्यार्थी वयाने पुरेसे प्रगल्भ असतात. शाळेप्रमाणे त्यांच्यावर महाविद्यालयांची सतत नजर नसते. सेलफोनवरील निर्बधांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची तर मोठी अडचण होईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
वांद्रय़ाच्या नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पंजवानी यांनीही याचीच ‘री’ ओढत अप्रत्यक्षपणे जॅमर लावण्यास विरोध दर्शविला. विद्यार्थी सेलफोनचा दुरुपयोग करतात हे खरे आहे. परंतु, त्यावर जॅमर हा तोडगा असू शकत नाही. सेलफोनच्या अतिवापरासंबंधात महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि पालकांचे मन वळविणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली.

दंड आणि मोबाईल पथके
सेलफोनच्या अर्निबध वापराला मर्यादा आणण्यासाठी महाविद्यालये आपापल्या स्तरावर प्रयत्न करीतच आहेत. हिंदुजा महाविद्यालयात वर्गात किंवा ग्रंथालयात सेलफोनच्या वापरावर बंदी आहे. ही बंदी धुडकावणाऱ्यांना महाविद्यालयाकडून ५०० रुपयांचा दंड केला जातो. एचआर महाविद्यालयात ‘सेलफोन पोलीस टीम’च्या माध्यमातून सेलफोनच्या वापर कमी करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातात. नॅशनल महाविद्यालयात परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांचे सेलफोन काढून घेतले जातात.

व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला
महाविद्यालय परिसरात जॅमर लावून सेलफोनवर अप्रत्यक्षपणे बंदी आणण्याचा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आहे. सेलफोनवर सरसकटपणे बंदी आणण्याऐवजी त्या संबंधात नियम करून त्याचा अमर्याद वापर रोखता येऊ शकतो. या संबंधात विद्यार्थ्यांची मते समजून न घेता बंदी लादणे तर फारच अन्यायकारक आहे.
अ‍ॅड. अजय तापकीर, सरचिटणीस, प्रहार विद्यार्थी संघटना