कल्याण-डोंबिवलीतील एकूण ४२ रस्त्यांचे सीमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यापूर्वी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या जल, मल वाहिन्या, महावितरण, बीएसएनएलच्या वाहिन्या पालिका प्रशासन की ठेकेदाराने काढायच्या या विषयावर प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये धुसफूस सुरू झाल्याने पालिका हद्दीतील रस्ते काँक्रिटीकरणाची कामे रखडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  युटीलिटीची कामे करण्यासाठी ठेकेदारांना सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा भरुदड पडण्याची शक्यता असल्याने ठेकेदारांनी ही कामे करण्यास नकार दिला आहे. पालिकेने ठेकेदारांबरोबरच्या करारात युटिलिटी सेवेचा उल्लेख केला नसल्याने त्याचा लाभ ठेकेदारांनी उचलला असल्याचे सांगण्यात येते. ठेक्यांमधील मलई काढण्यासाठी काँक्रिटीकरणाचे ठेके ठेकेदारांना घाईने देण्यात आले.
काँक्रिटीकरणाच्या कामाचे आदेश देऊन १८ महिने उलटून गेले आहेत. या मुदतीत कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कामांचा अद्याप श्रीगणेशाही झाला नसल्याचे सांगण्यात येते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या वाहिन्या अन्यत्र स्थलांतरित करून द्या. यासाठी पालिकेने युटिलिटी टेंडर्स मागवून ही कामे पूर्ण करावीत. मग आम्ही काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करू, अशी भूमिका काँक्रिटीकरणाच्या ठेकेदारांनी घेतली असल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. हे सर्व उद्योग करणारे पदाधिकारी, अधिकारी मलई खाऊन गप्प बसले आहेत. डोंबिवलीत घरडा सर्कल ते लोकमान्य टिळक पुतळा रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना युटिलिटी सेवांची कामे करताना उडालेला बोजवारा नागरिकांनी पाहिला आहे. या रस्त्याच्या रुंदीचा पाथर्ली व मंजुनाथ शाळेजवळ प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्त शंकर भिसे या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीविषयी मूग गिळून असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भिसे यांचा पालिकेच्या अभ्यासाविषयी सुरू असलेला गृहपाठ पूर्ण झाला की नाही याविषयी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Story img Loader