शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवलीतील टिळक चौक ते घरडा सर्कल या मार्गावर सिमेंट रस्ते उभारणीच्या कामाचा शुभारंभ करून दोन वर्षे उलटली तरीही हे काम सुरू करण्यास महापालिकेस यश आले नसल्याने डोंबिवलीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेस डोंबिवली शहरातून सर्वाधिक महसूल मिळतो. या महसुलाच्या तुलनेत डोंबिवली शहरात म्हणाव्या त्या प्रमाणात विकासकामे होत नाहीत, असा सर्वसाधारण तक्रारीचा सूर आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर डोंबिवलीत विकासकामांचा रतीब मांडू, असे आश्वासन शिवसेना नेत्यांतर्फे देण्यात आले होते. मात्र, निवडणूक होऊन एक वर्ष उलटत नाही तोच डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरश चाळण झाल्याचे चित्र दिसून आले. चाळण झालेल्या रस्त्यांचा पुरस्कार स्वीकारून महापौर तसेच आयुक्तांनी नाचक्की ओढवून घेतली. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील रस्त्यांना काँक्रीटचा मुलामा देण्याच्या कामाचा मोठा गाजावाजा करत शुभारंभ करण्यात आला. कल्याणमधील तीन तर डोंबिवलीतील एका रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कल्याणमधील दोन रस्त्यांच्या सिमेंटीकरणाची कामे सुरू आहेत. पण, दोन वर्षे उलटून गेली तरी डोंबिवलतील टिळक चौक ते घरडा सर्कल सिमेंटीकरणाचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेले नाही. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. टिळक चौक ते घरडा सर्कल रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी नसताना केवळ डोंबिवलीकरांचे समाधान करण्यासाठी हा रस्ता शुभारंभाच्या यादीत घुसविण्यात आला असे सांगण्यात येते. या रस्त्यावरील शाळेसमोरील काही इमारती रस्त्याला अडसर ठरत आहेत. आधारवाडी-खडकपाडा, पुना लिंक रोड येथील सिमेंट रस्त्याची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने या भागातील रहिवासी कमालीचे संतप्त आहेत.