‘स्वच्छ व सुंदर धुळे शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तब्बल १४ कोटी रुपये मंजूर करून शहर परिसरात सहा ठिकाणी पर्यटनस्थळांचा विकास करण्याला चालना दिली आहे. त्यात पांझरा नदी परिसर, अॅम्युझमेंट पार्क, श्री एकवीरा देवी मंदिर, लळिंग, नकाणे-हरण्यामाळ तलाव आणि डेडरगाव तलाव परिसराचा समावेश आहे.
माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तीन कोटी रुपयांतून पांझरा नदी परिसराचा विकास करण्यात येईल. बैठक व्यवस्था, सुसज्ज शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा, घाटाचे सुशोभीकरण आणि वाहनतळ अशी सोय याअंतर्गत करण्यात येईल. अॅम्युझमेंट पार्कसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून यातून खेळण्याचे साहित्य, वाहनतळ, पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यात येतील. एकवीरा देवी मंदिर परिसरातही सुसज्ज शेड तसेच इतर सुविधांवर तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. लळिंग परिसरात चिल्ड्रेन पार्क, अॅम्पी थिएटर, प्रसाधन गृह आदी व्यवस्थेसाठी दीड कोटी रुपये, नकाणे व हरणामाळ तलाव परिसरात रोप वे, डायनॉसोर पार्क, सायन्स पार्क, अॅडव्हेंचर कॅम्प, केवडय़ाची बाग, दुर्मीळ वनस्पतींचे जतन, भ्रमंती ट्रॅक यासाठी दीड कोटी, तर उर्वरित दीड कोटी रुपयांमध्ये डेडरगाव तलाव परिसरात सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती कदमबांडे यांनी दिली.