गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली. सटाणा, मालेगाव, देवळा व चांदवड या तालुक्यातील कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू आदी पिकांच्या नुकसानीचे पथकाने अवलोकन केले. यावेळी काही निवडक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. परंतु, आपली भावना मांडण्यासाठी ठिकठिकाणी जमलेल्या कित्येक शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करताच पथकाने पुढे मार्गस्थ होणे पसंत केले. या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसला होता. त्यामुळे आतापर्यंत कशाबशा तगलेल्या शेतीचीही वासलात लागल्याचे केंद्रीय पथकास पहावयास मिळाले. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीने उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पाहणी पथक उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले आहे. आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी पथकाने आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल केले आणि ते धुळ्याला रवाना झाले. परिणामी, पथकाची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला होता. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळपासून पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले. आर. एल. माथूर व एस. एम. कोल्हटकर या अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, कृषी अधिकारी एम. एस. पन्हाळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पथकाच्या ताफ्यात जवळपास पंधरा वाहनांचा समावेश होता. दुपारी केंद्रीय पाहणी पथकांच्या सदस्यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सींग’द्वारे चर्चा होणार असल्याने पथकाचा धावती पाहणी करण्यावर भर राहिल्याचे पहावयास मिळाले. शिवाय, वेळेअभावी निफाड तालुक्यात भेट देणेही टाळले.
मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांशी नुकसानीबाबत चर्चा केली. त्यानंतर दाभाडी, आघार, वडनेरभैरव व निताणकर वाडी या ठिकाणी पथकाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. निताणकर वाडी येथे शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मग हा ताफा सटाणा तालुक्यातील आसखेडा, वाघारे भागाकडे रवाना झाला. दिवसभरात देवळा तालुक्यातील खामखेडा, भहूर व वरवंडी तसेच चांदवड येथील वडनेरभैरव या ठिकाणी पथकाने नुकसानग्रस्त कांदा, डाळिंब, द्राक्षबागा, गहू व इतर पिकांची पाहणी केल्याची माहिती कृषी अधिकारी पन्हाळे यांनी दिली. पथक येणार असल्याचे समजल्यामुळे ठिकठिकाणी शेतकरी मोठय़ा संख्येने आधीच जमले होते. परंतु, काही ठिकाणी निवडक शेतकऱ्यांशी चर्चा करून पथकाने पाहणी आटोपती घेण्यास प्राधान्य दिले. काही निवडक शेतकऱ्यांना पथकासमोर आपल्या व्यथा मांडणे शक्य झाले. अस्मानी संकटाने शेतकरी पुरता कोलमडला असून शासनाने भरीव व तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, पीक कर्जाचे पुनर्गठन करावे या स्वरुपाच्या मागण्या काहींनी केल्या.
उरलीसुरली पिकेही भुईसपाट
गुरूवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील काही भागात वादळी वारा व गारपिटीत उरल्यासुरल्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले. केंद्रीय पथकाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला चांदवड, देवळा, बागलाण, सटाणा, निफाड, दिंडोरी आदी भागात तुफानी गारपिटीने झोडपून काढले. याआधी उपरोक्त भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करावा लागला असताना नैसर्गिक संकटातून बचावलेली पिके या गारपिटीने भुईसपाट केली. डाळिंब, गहू, हरभरा, मका, द्राक्षबागा, भाजीपाला, कांदा, टोमॅटो अशी सर्व पिके उध्वस्त झाली आहेत. शुक्रवारी या परिसरात अतिशय भयावह चित्र होते. बहुतांश शेतांत नावालाही
पीक शिल्लक राहिले नाही. डाळिंब उत्पादकांसह बहुसंख्य शेतकरी कर्जाच्या विळख्यात गुरफटणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शेतीसाठी काढलेले कर्ज फेडण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. ज्या पिकांसाठी कर्ज काढले, ती पिके गारपिटीत भुईसपाट झाल्यामुळे कर्ज भरणे, कुटुंबियांचा चरितार्थ, नव्याने करावयाची लागवड असे अनेक प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभे असल्याचे दिसत आहे.
समितीची पाहणी अन् नुकसानग्रस्तांच्या डोळ्यात पाणी
गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली.
First published on: 15-03-2014 at 05:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central committee visits hailstorm hit farmers